शेतकऱ्यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला  Pudhari
नांदेड

Nanded Farmers Protest | कोरडा दुष्काळ जाहीर करून एकरी ५० हजारांची मदत द्या; हिमायतनगर तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

पावसाअभावी आणि वाढत्या उन्हामुळे सोयाबीन, कापूस, हळद, तूर यासह अन्य पिके सुकू लागली

पुढारी वृत्तसेवा

Dry Drought Declaration Himayatnagar Tehsil Morcha

हिमायतनगर : गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने हिमायतनगर तालुक्यात खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसाअभावी आणि वाढत्या उन्हामुळे सोयाबीन, कापूस, हळद, तूर यासह अन्य पिके सुकू लागली आहेत. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक भागांत पिके करपण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुका कोरड्या दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावेत आणि तातडीने दुष्काळी अनुदान वितरित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत आणि दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

शासनाचे शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

मोर्चात माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT