Himayatnagar farmer Death
हिमायतनगर : अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या मोठ्या नुकसानीसोबतच वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च या आर्थिक संकटाला कंटाळून आदेगाव (ता. हिमायतनगर) येथील लक्ष्मण पोतंन्ना पालजवाड (वय ४५) या शेतकऱ्याने मंगळवारी (दि.९) गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत पालजवाड यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज होते. दोन मुली आणि एक मुलगा यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ते झगडत होते. मात्र, सलग अतिवृष्टीमुळे नाल्यालगत असलेली त्यांची शेती वाहून गेली. वाढत्या आर्थिक ताणाला कंटाळून त्यांनी शेतातील गट क्रमांक २४१ मधील पळसाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकरी व गावकरी घटनास्थळी धावून आले. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर येथे हलविण्यात आले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबीयांच्या मते, अलीकडच्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असूनही शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नव्हती. उलट बँकांकडून कर्जफेडीसाठी सतत नोटिसा येत होत्या. त्यातच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या फीचा प्रश्न, इतर मुलांच्या शिक्षणाचा खर्च व घरगाडा चालविण्याची जबाबदारी यामुळे पालजवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.