Nanded Himayatnagar Coaching Class Director Death
हिमायतनगर : हिमायतनगर शहरातील एका नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक एन. टी. जाधव यांनी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना शुक्रवारी ( दि.१० ) पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे शहरासह परिसरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या कोचिंग क्लासमधून शहर व ग्रामीण भागातील सुमारे १,२०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. एन. टी. जाधव हे शिस्तप्रिय, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते.
शुक्रवारी पहाटे क्लासेसच्या आवारातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला.
दरम्यान, काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागेच्या वादामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मात्र, नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
एन. टी. जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे हिमायतनगर परिसरात शोककळा पसरली आहे.