Nanded rainfall pudhari photo
नांदेड

Nanded rainfall : ‘पुष्य’ नक्षत्राचा जिल्ह्याला मोठा दिलासा!

विष्णुपुरी प्रकल्प भरला

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : मृग आणि त्यानंतरच्या दोन नक्षत्रांत नांदेड शहर आणि जिल्ह्यात साधारण पावसाची नोंद झाल्यानंतर मागील आठवडाभरात नांदेड जिल्ह्याने निसर्गाचा चमत्कार अनुभवला. ‘पुष्य’ नक्षत्राच्या उत्तरार्धातील दमदार-संततधार पावसाने जिल्हावासीयांना दिलासा देत सारे चित्रच पालटून टाकले. तीन दिवसांपूर्वी जेमतेम ३५ टक्के भरलेला विष्णुपुरी प्रकल्प शनिवारी पूर्णपणे भरला.

शुक्रवारी सकाळी (दि.३१) मागील २४ तासांतील पावसाची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केल्यानंतर बदललेल्या चित्राचे वास्तव समोर आले. वरील कालावधीत जिल्ह्यातील ९३ पैकी ७३ महसूल मंडळांत झालेल्या अतिवृष्टीने चित्र पालटण्यास मोठा हातभार लावला. गेल्या दोन महिन्यांत २४ तासांमध्ये ७३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंदही प्रथमच झाली.

नांदेड जवळील विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे सोमवारी सकाळी हे धरण ९८ टक्के भरले होते. मागील काही आठवडे जिल्ह्यावर चिंतेचे ढग दाटलेले असताना पुष्य नक्षत्र मात्र दिलासा देणारे ठरले.

२० जुलै रोजी हे नक्षत्र सुरू झाले तेव्हा त्यापूर्वीच्या ५० दिवसांत जिल्ह्यात २०० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. एक किंवा दोनवेळा काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. २१-२२ जुलै दरम्यान २६ मि.मी. पावसाची भर पडल्यानंतर २७ ते ३१ जुलै दरम्यानच्या संततधार पावसाने ४०० मि.मी. पावसाचा टप्पा ओलांडला. ३०-३१ जुलै दरम्यान जिल्ह्यात सुमारे १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये खरीप पिकांच्या वाढीस मोठा हातभार लागला.

दरम्यान शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली. सोमवारची सकाळ ढगाळ वातावरणात उगवली; पण नंतर नांदेड शहर व बहुतांश भागात चार दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले. १ ऑगस्टच्या सकाळपर्यंत ४१८ मि.मी. पावसाची नोंद झाली. मागील वर्षी या तारखेपर्यंत पडलेल्या पावसाचे आकडेही आता पिछाडीवर गेले आहेत.

‘विष्णुपुरी’च्या पाण्यात झपाट्याने वाढ!

पुष्य नक्षत्रातील सर्वदूर पावसामुळे गेल्या गुरुवारपासून नांदेड शहराजवळच्या विष्णुपुरी प्रकल्पामध्ये पाण्याची आवक सुरू झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत ४२ टक्क्यांवर गेलेला पाणीसाठा नंतरच्या २४ तासांत झपाट्याने वाढला. या प्रकल्पातील पाणीसाठ्याची टक्केवारी ९८ टक्क्यांवर गेली आहे. मागील वर्षी याच तारखेला विष्णुपुरी प्रकल्पामध्ये सुमारे ८५ टक्के पाणीसाठा झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT