

विशेष प्रतिनिधी
नांदेड : धर्माबाद परिसरातल्या जारीकोट व काही गावांमधील एस.टी. प्रवर्गातले बरेच तरुण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या हुद्यांसाठी राज्य सेवेमध्ये निवडले गेले. त्यांच्यातील सनदी अधिकारी अनिल रामोड तीन वर्षांपूर्वी लाचखोरीत अडकल्यानंतर आणखी एक बडा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला असून या अधिकार्याने रकमेच्या मागणीत रामोड यांनाही मागे टाकले. लाचखोरीमुळे गाव बदनाम होत असल्याची भीती याच तालुक्यातील एका अधिकार्याने येथे व्यक्त केली.
बीड येथे शुक्रवारी लाचलुचपत विभागाच्या छ.संभाजीनगर येथील पथकाने विभागीय वनअधिकारी श्रीनिवास लखमावाड यांस लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर या अधिकार्याच्या नियुक्तीच्या ठिकाणासह धर्माबाद तालुक्यातील मूळ गावही चर्चेत आले.
महसूल खात्याच्या सेवेतून चार वर्षांपूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेत गेलेले अनिल रामोड हे धर्माबाद तालुक्यातील जारीकोट-सायखेडचे, तर लखमावाड रत्नाळी गावचा मूळ रहिवासी असून त्यास नजीकच्या काळात राज्य वनसेवेतून भारतीय वनसेवेत जाण्याची सुसंधी होती. अपसंपदेबाबत त्याला काही हितचिंतकांनी सावधगिरीचा सल्लाही दिला होता; पण रामोड यास मागे टाकून त्याने तब्बल ४५ लाखांची लाच मागितल्यामुळे या गावचेच एक अधिकारी चक्रावून गेले.
धर्माबाद परिसरातील जारीकोट व अन्य काही भागांतील मुन्नेरवारलू समाजातील शेकडो तरुणांनी मागील २५-३० वर्षांत शिक्षण पूर्ण केल्यावर स्पर्धा परीक्षांच्या तयारीतून राज्य सेवेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यांत बर्याच जणांना यश आले. आजही जारीकोटचे सुमारे २५ भूमिपुत्र वेगवेगळ्या विभागांत मोठ्या हुद्यावर आहेत.
श्रीनिवास लखमावाड याने तर लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य वन सेवेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत २०१६ साली अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. बी.टेक. इंजीनिअर असलेल्या श्रीनिवासच्या नोकरीस जवळपास १० वर्षे झाली होती. काही हितचिंतकांनी त्याला सावधगिरीचा सल्ला वेळोवेळी दिला होता. पण ३१ जुलैच्या एका सापळ्यात तो अडकल्यानंतर एकच खळबळ उडाली.
तीन वर्षांपूर्वी पुण्यात महसूल आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अनिल रामोड यास भूसंपादनाच्या मावेजाच्या प्रकरणात आठ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले होते. नंतरच्या चौकशीत या अधिकार्याच्या कार्यालयात व घरात मोठी रोख रक्कम सापडली. त्यापूर्वी या अधिकार्याने मराठवाड्यात विविध पदांवर काम केले होते. त्यांच्यानंतर शासकीय सेवेत आलेल्या लखमावाड याने तर आपल्या खात्याशी संबंधित काही प्रकरणांत एकत्रपणे ४५ लाखांची लाच मागितली; पण संबंधिताने केलेल्या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने शुक्रवारी बीड येथे सापळा रचून त्याला पकडल्यामुळे एकच खळबळ उडाली.
श्रीनिवास लखमावाडचे शालेय शिक्षण नांदेडमध्ये झाले. त्याचे वडील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीत होते. ते व्यवस्थापक पदावरून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. चांगले भवितव्य असलेला मुलगा लाचखोरीत अडकल्यानंतर नांदेडस्थित लखमावाड परिवाराला धक्काच बसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजले.
जागरुक अधिकार्यांची चिंता!
नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जमाती प्रवर्गात शिरकाव केलेल्या एका समाजाबद्दल मोठा रोष असला, तरी अनेकांनी आपल्या प्रमाणपत्राची वैधता प्राप्त करून घेत शासकीय सेवेमध्ये चांगले स्थान मिळविले. त्यामध्ये धर्माबाद तालुक्यातल्या भूमिपुत्रांचा नेहमीच उल्लेख केला जातो. बर्याच अधिकार्यांनी आपली सेवा यशस्वीपणे पार पाडून निवृत्ती स्वीकारली. अनेकजणं राज्याच्या वेगवेगळ्या भागांत चांगल्या हुद्यावर कार्यरत आहेत; पण लाचखोरीच्या दोन मोठ्या प्रकरणांनंतर वरील प्रवर्गातील काही जागरुक अधिकार्यांनी चिंता व्यक्त केली.