Nanded Heavy Rain Mukhed Taluka Relief work started
विशेष प्रतिनिधी
नांदेड : तीन दिवसांपूर्वीच्या जीवघेण्या प्रलयानंतर मुखेड तालुक्यातील हसनाळ आणि अन्य गावांमधील मदतकार्य, बाधित कुटुंबांना सावरणे-आधार देणे या बाबी शासकीय यंत्रणांकडून सुरू असतानाच पूरग्रस्त भागात वेगवेगळ्या माध्यमांतून सामाजिक भानही सक्रिय झाल्याचे दिसून आले.
मुखेड तालुक्याशी निकटचा संबंध असलेले माजी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर वेगवेगळ्या गावांमध्ये त्वरेने पोहोचले. त्यांनी आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमांतून गरजू कुटुंबांना अन्नधान्य व इतर आवश्यक साहित्याचे वाटप सुरू केले. हसनाळ, भेंडेगाव, रावणगाव, भिंगोली, रावी, सावळी आदी काही गावांमध्ये सर्वच कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यासोबत वाहून गेल्यानंतर अशा कुटुंबांना हे साहित्य मिळवून देण्यात पाटील मित्रमंडळाने पुढाकार घेत अशा संकटप्रसंगी सढळहस्ते मदत करा, असे आवाहन रामदास पाटील यांनी दानशुर व्यक्ती आणि संस्थांना केले आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित गावांमधील कुटुंबातल्या लहान मुलांचे शालेय साहित्यही वाहून गेल्याची बाब समोर आल्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेने मदतकार्यामध्ये आपले योगदान देण्याचे पाऊल टाकले. हसनाळ आणि भिंगोली या गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळवून देण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात येताच जिल्ह्यातील साहित्यिक-पत्रकारांनी आपली आर्थिक मदत जाहीर केली. साहित्य परिषदेकडून प्रथमच असा उपक्रम हाती घेतला असल्याचे नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार आणि राम तरटे यांनी सांगितले. हे आवाहन जारी होताच अनेक साहित्यिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
मुखेड तालुक्याच्या काही भागांत झालेल्या मुसळधार पावसाने एका रात्रीतून केलेला विध्वंसही समोर येत आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या सावळी या गावातून मरखेलला जाणाऱ्या रस्त्यावरील दोन पूल वाहून गेल्यामुळे या दोन गावांदरम्यानचा संपर्क तुटला आहे. मरखेल परिसरात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची महाविद्यालये असून विद्यार्थ्यांची ये-जा याच रस्त्यावरून होते. हा रस्ता तत्काळ पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.