

नांदेड : यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचे प्रमाण अधिक दिसून येते. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात सुद्धा 11 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. हा पाऊस 28 मे रोजी झाला. त्यानंतर 18 ऑगस्टपर्यंत 11 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. दि. 26 रोजी 9 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सिंदगी (ता. किनवट) येथे दि. 17 रोजी सकाळी झालेल्या नोंदीनुसार 24 तासांत 255 मिमी एवढा विक्रमी पाऊस झाला.
उन्हाळा अतिशय जीवघेणा गेल्यानंतर पावसाळा उशिरा सुरु झाला. एरवी मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तापमान खाली घसरते. परंतु यंदा मान्सूनपूर्व पाऊस एकदाच झाला. त्यातही 11 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर जूनमध्ये थेट 26 तारखेपर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली. यावेळीही अतिवृष्टी होऊन 39 मंडळांमध्ये पावसाचा जबर फटका बसला. तत्पूर्वी 10 जून रोजी सुद्धा 9 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ठराविक भागातच 65 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. परंतु वातावरणातील उकाडा काही कमी झाला नाही. मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्र सुद्धा जवळपास कोरडे गेले.
खर्या अर्थाने पावसाला 19 जुलैनंतर सुरुवात झाली. जुलैच्या 24 तारखेला चार मंडळांत तर 27 तारखेला 17 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्राने आणि आता मागील 3 दिवसांत मघा नक्षत्राने चित्रच बदलून गेले. 8 ऑगस्ट रोजी 5 मंडळांमध्ये, 15 ऑगस्ट रोजी 27 तर 16 रोजी पुन्हा 4 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. रविवारी (दि. 17) पुन्हा 24 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. आणि सोमवारी (दि. 18) पुन्हा 9 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अर्थात एकट्या ऑगस्ट महिन्यात 5 वेळा जोरदार पाऊस झाला. आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा असून ऑगस्टचे 21 दिवस शिल्लक आहे.
मागील काही वर्षांपासून पावसाचा अनुशेष गणेशोत्सव भरून काढत आला आहे. पण, यंदा आश्लेषा आणि मघा नक्षत्राने अपेक्षित पावसाच्या 100 टक्क्यांपेक्षा अधिक मजल मारली असून गणेशोत्सवातील पाऊस वार्षिक सरासरीच्या दृष्टीने उपकारक ठरणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी (दि. 22) पोळा असून या सणावर सुद्धा पावसाचे सावट आहे.