Accident News Pudhari
नांदेड

Nanded Accident | हस्तरा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू; पहाटे घटना

पुढारी वृत्तसेवा

Nanded Hastara road accident

हदगाव : हदगाव तालुक्यातील मोजे हस्तरा येथे अज्ञात ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.

रस्त्याच्या कडेला चालत असलेले बाळू केरबा कांबळे (वय ५७, रा. हस्तरा) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत कांबळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हस्तरा, धानोरा, रुई, बोरगाव परिसरात कयाधू नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असून, ही वाहतूक प्रामुख्याने रात्री उशिरा व पहाटे चारनंतर केली जाते. या वेळेत पोलीस किंवा महसूल यंत्रणा रस्त्यावर नसल्याचा गैरफायदा घेत बिना नंबरच्या वाहनांचा वापर केला जातो. सदर अपघातही अशाच एका बिना नंबरच्या ट्रॅक्टरमुळे झाल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, हदगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. मात्र पोलिसांनी एक संशयित ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

मृत बाळू केरबा कांबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन विवाहित मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. या परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, नंबर नसलेल्या ट्रॅक्टरमुळे अपघातानंतर कारवाई कोणावर करायची, हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे.

सकाळी ग्रामस्थांना मृतदेह आढळला

सकाळी सातच्या सुमारास गावापासून सुमारे २०० मीटर अंतरावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तपासणीअंती तो बाळू केरबा कांबळे असल्याचे स्पष्ट झाले. कांबळे हे दररोज पहाटे पाच वाजल्यापासून हनुमान मंदिर व लगतच्या बुद्धविहार परिसरात झाडलोट करून स्वच्छता करत असत. यावेळी ट्रॅक्टरची धडक बसली असावी, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT