हदगाव, पुढारी वृत्तसेवा: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मनोज पाटील जरांगे आणि दत्ता पाटील- हडसणीकर यांना पाठिंबा देण्यासाठी बाभळी येथील मराठा समाजाच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयावर आज (दि.१२) मोर्चा काढण्यात आला.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्हातील मौजे अंतरवाली सराटी येथे १५ दिवसांपासून मनोज पाटील- जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. तसेच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हदगाव तालुक्यातील मौजे हडसणी येथील दत्ता पाटील हडसणीकर हे तहसिल कार्यालयासमोर सात दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत.
शहरातील जुन्या बस स्टॉप येथून सकाळी ११.३० च्या दरम्यान मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी घोषणाबाजी करत, आपल्या मागण्यांचे फलके हातात घेऊन, टाळ मृदंगाचा गजर करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्या मान्य करून प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, यासाठी त्यांना पाठिंबा म्हणून राजकुमार भुसारे, आत्माराम पाटील वाटेगावकर, संदीप पाटील- शिंदे, प्रवीण पाटील- मोरे हे चार जण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
हेही वाचा