कारने दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला Pudhari
नांदेड

Nanded Accident | हदगाव–तामसा मार्गावर कारची दुचाकीला धडक: चौघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

हदगावकडून तामसाकडे जाणाऱ्या कारची दोन दुचाकींना जोराची धडक

पुढारी वृत्तसेवा

Hadgaon Tamsa Highway Car Bike Collision

हदगाव : हदगाव तालुक्यातील हडसनी फाटा येथे बुधवारी (दि. २२) रात्री सुमारे नऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १२ केएन २५०९ क्रमांकाच्या भरधाव कारने हडसनी फाट्यावर दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. पहिल्या दुचाकीवरील रेखाबाई भाऊराव नरवाडे (वय ४२), त्यांचा मुलगा यशवंत नरवाडे (वय २३) आणि ननंद अनुसया लोणारे (वय ४३) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी भोकर येथील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या जखमीला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे.

हडसनी फाटा हा अपघातांचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. विशेष म्हणजे २१ एप्रिल रोजीही याच ठिकाणी दोन अपघात झाले होते आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा भीषण अपघात घडला. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी येथे गतिरोधक, रेडियम इंडिकेटर्स आणि हायमास्ट लाईट बसवण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सततच्या अपघातांमुळे गुरुवारी (दि. २३) ग्रामस्थ आक्रमक झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत, जोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण आणि ठोस सुरक्षा उपाययोजना होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या भीषण घटनेमुळे हडसनी परिसरात शोककळा पसरली असून नरवाडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद आघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT