Nanded news | पोलीस सेवेतही वाचनाचा छंद जोपासता आला : सदानंद दाते

दिवसांतले काही तास वाचन, व्यायाम यासाठी देता येतात
IPS Sadanand Date reading hobby
IPS Sadanand Date reading hobby
Published on
Updated on

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर गेली ३५ वर्षे वाचनाचा छंद जोपासला. लहान वयात लागलेली वाचनाची गोडी पुढे कशी समृद्ध झाली, हे त्यांनी ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या आपल्या पुस्तकात शब्दबद्ध केले असून आजच्या पुस्तक दिनानिमित्त दाते यांच्या नोंदीतील हा काही अंश...

माझी वाचनाची आवड साधारणपणे पाचवी-सहावीत असताना माझ्या लक्षात आली. त्या सुमारास शेजारी आणि मित्रांच्या घरी असलेली सगळी पुस्तकं मी वाचून काढली होती. तरीही आणखी वाचावंसं वाटत होतं. मग सुट्टीत मी आमच्या घराजवळील वाचनालयात जात असे. रोज एक आणि कधी-कधी तर, एका दिवसात दोन पुस्तकांचीही मी फडशा पाडत असे. नेमकं काय वाचायचं हेही तेव्हा माहीत नव्हतं; पण सुरुवातीला गुप्तहेर कथांपासून ऐतिहासिक कादंबऱ्यांपर्यंत आणि नंतर ‘बलुतं’सारख्या पुस्तकांपर्यंतचा प्रवास मी स्वतःचा वाट शोधत केला.

पोलीस सेवेत रुजू झाल्यावरही मला माझा वाचनाचा छंद जोपासता आला. हवा तितका वेळ वाचनासाठी मिळत नसला, तरी कामाच्या निमित्ताने आणि विरंगुळा म्हणूनही मी वाचन करत आलेलो आहे. त्यासाठी वेळेच्या नियोजनाचा मला उपयोग होतो. दिवसांतले काही तास वाचन, व्यायाम यासाठी देता येतात. शिवाय साप्ताहिक सुटीचा दिवसही असतोच.

वाचनाला जेव्हा-जेव्हा मला वेळ मिळाला, तेव्हा मी व्यवस्थापन, नेतृत्व, संघटनशास्त्र, आर्थिक गुन्हे या कामाच्या आणि आवडीच्या विषयांबरोबरच तत्त्वज्ञान आणि अध्यात्म या विषयांशी निगडित अनेक पुस्तकं वाचत गेलो. अनेक चांगल्या कादंबऱ्या आणि नॉन-फिक्शन पुस्तकांचही वाचन केलं. आपलं आयुष्य खरं तर एकसंधच असतं; काम, विरंगुळा ही एकाप्रकारे आपणच केलेली कृत्रिम विभागणी असते-हे मला माझ्या वाचनातून उमगत गेलं.

मला ज्या लेखकाने सगळ्यात जास्त समृद्ध केलं ते म्हणजे विनोबा. कामाच्या सुरुवातीच्या वर्षांत एकेठिकाणी खात शिकत असताना त्यांच्या लेखनाने मला मोठा आधार तर दिलाच, पण पुढे कसोटीच्या प्रसंगांत विचलित न होता कर्तव्यावर लक्ष केंद्रित कसं करावं, हेही त्यांनी मला शिकवलं. विनोबांचं लेखन प्रभावी आहे, कारण त्या मागे त्यांचं चिंतन आणि समर्पणभावाने जगलेलं आयुष्य आहे, असं मी मानतो.

वाचन आणि मनन यांचं मूळ सतत काही तरी नवीन माहिती करून घेण्यामध्ये असतं, असं मला वाटतं. कधी कधी आपल्या प्रश्नांची उत्तरं आजूबाजूच्या माणसांकडे नसतात, पण ती पुस्तकात मिळू शकतात, याची जाणीव झाल्यामुळे मला वाचनाचा नाद लागला. रोजचं कॉलेज, वर्तमानपत्रं टाकणं आणि इतर नोकऱ्यांमुळे पायी चालणं आणि सायकल चालवणं यात माझा बराच वेळ जात असे. त्यावेळेत माझ्या मनात वाचनविषय घोळत राहायचे. त्यामुळे मनाचे संस्कार घट्ट होत गेले. एकूणच विचारांना वाचनाची आणि वाचनाला मनन-चिंतनाची जोड मिळाली आणि त्यातून प्रभावी काम करण्याचे उपाय सुचत राहिले. पुस्तकांचं वाचन हाच त्या मनन चिंतनाचा पाया राहिला आहे. वाचन, व्यवस्थापन शास्त्रातील तंत्र आणि जोडीला धावण्या-चालण्याचा व्यायाम आणि ध्यानधारणा यामुळे कामातील आणि आयुष्यातील ताणाचं व्यवस्थापन करता येऊ शकतं, असा माझा अनुभव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news