नांदेड : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने शहरात दोन ठिकाणी छापे टाकून तब्बल ६८ लाख २५ हजार ६९५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेत्रातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी डीआयजी शहाजी उमाप यांनी अधिकाऱ्यांचे विशेष पथक नांदेड शहरात रवाना केले होते. या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी पहिली कारवाई इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली.
आमेर फंक्शन हॉलजवळील एका खोलीत तसेच इस्लामपुरा भागातील सेंट्रल ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार दोन्ही ठिकाणी छापे टाकून ५४ लाख ०६ हजार ०९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सय्यद दस्तगिर सय्यद इब्राहीम (रा. आस कॉलनी, इतवारा), अब्दुल बबलू अब्दुल हमीद (रा. मदिनानगर, मुदखेड), मोहम्मद असिफ मोहम्मद हुसेन (रा. चुन्नाभट्टी, खुदबईनगर) आणि अब्दुल तस्लीम अब्दुल मनान सौदागर (रा. गुलशन कॉलनी, इतवारा, नांदेड) यांच्याविरोधात इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४, २७५, ३ (५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ च्या कलम २६, २७, ३० (२), ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आस कॉलनी येथे मोहम्मद फिरोज सईद याच्या घरावर छापा टाकला. तेथून १४ लाख १९ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोहमद फिरोज मोहमद सईद व मोहमद फैज मोहमद सईद (दोन्ही रा. आस कॉलनी, नांदेड) यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकों प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कामगिरीबद्दल डीआयजी शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.