Gharapuri Hanuman temple lightning strike
हिमायतनगर : तालुक्यात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना हैराण करुन सोडलं असून घारापूर येथील हनुमान मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. सुदैवाने मंदिर परिसरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही मात्र कळसाचा काही भाग तुटून खाली पडल्याची घटना घडली आहे. यापूर्वी देखील याच मंदिरावर वीज पडली होती अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
हिमायतनगर तालुक्यात सोमवारी रात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट झाला. या दरम्यान घारापूर येथील हनुमान मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने कळसाचा काही भाग तुटून कळस खाली पडला. सुदैवाने या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज (दि.१६) दुपारी घारापूर घटनास्थळी हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार एच. जी. पठाण, मंडळ अधिकारी अनरवाड, तलाठी एस.एल.बारदेवाड यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यापूर्वीही देखील याच मंदिरावर वीज कोसळली होती, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.