नांदेड : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील तब्बल ५१ हजार ३३० पात्र शेतकऱ्यांसाठी ३८१ कोटी ९४ लाख ६७ हजार ३८ रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केली आहे.
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) शाहूराज हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ५३५ कर्जदार शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ३६ लाख ९ हजार ७३१ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. संबंधित बँकांकडून ही रक्कम कर्जखात्यांवर जमा केली जात आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात आधीच १२ हजार ९२९ पात्र शेतकऱ्यांना १०६ कोटी २४ लाख ९८ हजार २३१ रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकरी थकबाकीमुक्त होऊन आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्यास पूर्णपणे पात्र ठरणार आहेत.
दरम्यान, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्यांपैकी १२ हजार २५७ शेतकऱ्यांकडे अजूनही 'ॲग्रीस्टॅक आयडी' उपलब्ध नाही. हा आयडी नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.
त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आधी आपले ॲग्रीस्टॅक नोंदणीकरण पूर्ण करून आयडी प्राप्त करावा आणि त्यानंतर तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कर्जमाफीचा लाभ थेट खात्यात मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार ६६६ शेतकऱ्यांनी हे प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. मात्र, अद्यापही २३ हजार १०६ पात्र शेतकरी या प्रक्रियेपासून दूर आहेत. प्रमाणीकरण न झाल्यास कर्जमाफीची रक्कम मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रावर जाऊन त्वरित प्रमाणीकरण पूर्ण करावे.
दुसरा टप्पा निधी: ३८१.९४ कोटी (५१,३३० पात्र शेतकरी) ; आयडी नसलेले शेतकरी: १२,२५७
जिल्हा बँक हिस्सा: ११.३६ कोटी (१,५३५ शेतकरी)
आधार प्रमाणीकरण पूर्ण: ७३,६६६ शेतकरी
प्रमाणीकरण प्रलंबित: २३,१०६ शेतकरी