नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे सुरू आहे. आतापर्यंत शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या तीन याद्यांमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ९१२ शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी १ लाख ४१ हजार ८३५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १ लाख २ हजार २१८ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६१.५६ कोटी रुपये इतकी कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
शासनाच्या दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. योजनेत अल्प, अत्यल्प किंवा बहुभूधारक असा भेदभाव न करता पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. कुटुंबाऐवजी वैयक्तिक शेतकरी हा लाभाचा घटक मानण्यात आला आहे.
कर्जमाफी, एकरकमी परतफेड आणि प्रोत्साहनपर लाभ
योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज तसेच या कालावधीत पुनर्गठित झालेले अल्पमुदतीचे पीककर्ज दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असून दि. ३१ मार्च २०२६ रोजीपर्यंत परतफेड झालेले नसल्यास, संबंधित पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात तीन याद्या जाहीर
योजनेच्या पोर्टलवर नांदेड जिल्ह्यातील बँकांनी एकूण २ लाख २४ हजार ८४७ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहेत. यापुढेही पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांच्या कार्यालयात योजनेसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष कार्यरत आहे. ए. डी. भागानगरे, सहायक निबंधक (प्रशासन) हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेशी संबंधित तक्रारी किंवा शंकांसाठी संपर्क क्रमांक ९२८४३५०७३१ वर संपर्क साधावा.
मयत शेतकरी श्री. शंकर अबानराव क्षीरसागर यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा वजिराबाद, नांदेड येथून दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने ते थकीत झाले. दि. ३१ मार्च २०२६ अखेर त्यांच्या कर्जखात्यावर २ लाख ८ हजार १०४ रुपये थकबाकी होती.
शेतकऱ्यांनी कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये
कर्जमुक्ती योजनेबाबत काही शंका अथवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित बँक, तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, तहसीलदार किंवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या निकषांनुसार योग्य तो लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे यादीत नाव अद्याप आलेले नसल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शाहुराज हिरे यांनी केले आहे.
बोरगाव तेलंग, ता. जि. नांदेड येथील शेतकरी शंकर अबानराव क्षीरसागर यांनी कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव न आल्यामुळे आत्महत्या केल्याचे समाजमाध्यमांवरून निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने प्रशासनाने संबंधित कर्जाची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.