नांदेड : राज्य शासनाची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ राज्यभर राबविली जात असताना नांदेड जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांच्या संकटाची तीव्रता कमी झालेली दिसत नाही. कर्जमुक्तीच्या घोषणेने एका बाजूला दिलासा मिळत असला, तरी दुसरीकडे पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हातातून जाण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची करुण बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात १४, जुलैमध्ये १३ तर ऑगस्टमध्ये ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजेच अवघ्या तीन महिन्यांत ३५ कुटुंबांवर कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूचे दु:ख ओढवले आहे. कर्जमुक्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आत्महत्यांचा हा वाढता आकडा शेतीसमोरील संकटाची गंभीरता अधोरेखित करणारा ठरत असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार बारडकर यांनी म्हटले आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ हजार ९२९ शेतकऱ्यांसाठी १०६ कोटी २४ लाख ९८ हजार २३१ रुपये प्राप्त झाले. तर सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात ५१ हजार ३३० शेतकऱ्यांसाठी ३८१ कोटी ९४ लाख ६७ हजार ३८ रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा केली जात असतानाच कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या थांबल्या नसल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे.
या पार्श्र्वभूमीवर कर्जमुक्तीचा आनंद साजरा करावा की पावसाअभावी वाया जाणाऱ्या खरीप हंगामाचे दु:ख करावे, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. एका संकटातून बाहेर पडण्याची आशा निर्माण होत असतानाच दुसरे संकट दारात उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसासाठी ओळखली जाणारी नक्षत्रे उलटून गेली तरी अपेक्षित पाऊस झाला नाही. पावसाचे प्रमाण टक्केवारीत ‘साठीच्या आत’ असल्याचे सांगितले जात असले, तरी शेतातील परिस्थिती मात्र आकडेवारीपेक्षा भयावह असल्याचे चित्र दिसत आहे.
पूर्वी ‘पोळा... पाऊस झाला भोळा’ अशी म्हण प्रचलित होती. म्हणजे पोळ्यानंतर पावसाळा संपत असल्याचे मानले जायचे. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाचे चक्रच बदलल्याने ऑक्टोबरअखेरपर्यंत पाऊस लांबण्याची आणि गणेशोत्सवाच्या काळात पावसाची सरासरी भरून निघण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असते. यंदा मात्र ही आशाही आता मावळू लागली आहे.
सोयाबीन वाळले; उत्पादन क्षमतेवर परिणाम
खरीप हंगाम वाया गेल्यात जमा झाला असून जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन पाण्याअभावी वाळू लागले आहे. अन्य पिके हिरवी दिसत असली तरी त्यांची उत्पादनक्षमता कमालीची घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात यंदा अपेक्षित उत्पादन येण्याची शक्यता कमी झाली आहे. पावसाअभावी नापिकीचे संकट असतानाच ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांना शेतीमालाच्या भावाचा फटका बसत आहे. विशेषतः केळी उत्पादक शेतकरी बाजारभाव घसरल्याने अडचणीत आले आहेत. त्यामुळे ‘पिकले तर भाव नाही आणि भाव मिळाला तर पीक नाही’ अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
साडेसाती संपेना; आत्महत्यांचा आकडा मात्र वाढतोय
शेतकऱ्यांच्या मागची साडेसाती संपण्याचे नाव घेत नाही. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी बाजारभावाचा फटका आणि त्यात कर्जबाजारीपणा, अशा चक्रात शेतकरी अडकला आहे. यंदाच्या खरीप हंगामावर पावसाचे सावट गडद होत असताना ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी जिल्ह्यातील शेती संकटाची गंभीरता पुन्हा एकदा समोर आणली आहे. पर्जन्यमानाची हीच स्थिती कायम राहिल्यास जलसाठे लवकर आटण्याची शक्यता असून पुढील काळात कोरड्या दुष्काळाची खडतर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्जमुक्तीचा आर्थिक आधार मिळण्याबरोबरच पिकांचे नुकसान, बाजारभाव, पाणीटंचाई आणि शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तातडीने हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे.