नांदेड

Nanded News : दरोडेखोरांच्या झटापटीत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी: लाखाचा ऐवज लंपास

अविनाश सुतार


माळाकोळी : माळाकोळीपासून (ता.लोहा) एक किलोमीटर अंतरावरील खिरुताडा लांडगेवाडी येथे सोमवारी (दि.२०) मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी सोन्या -चांदीच्या दागिन्यासह १ लाखाचा ऐवज पळविला. यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत वृद्ध पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. (Nanded News)

याबाबत अधिक माहिती अशी की, माळाकोळीपासून दोन किलोमीटर अंतरावरील खिरुताडा लांडगेवाडी येथे मेहरबान परसराम चव्हाण (वय ६५), व विमलबाई मेहरबान चव्हाण (वय ६०, रा. दुर्गा तांडा, ता. कंधार) हे पतीपत्नी मागील अनेक वर्षापासून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून पती-पत्नी झोपेत असताना त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर चांदीच्या कोपऱ्या, वाळे मनी मंगळसूत्र व गंठण असा जवळपास १ लाखाचा ऐवज लंपास केला. (Nanded News)

घटनास्थळी नांदेडचे पोलीस महासंचालक शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, लोहाचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर, माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी पाहणी केली. गणेश मेहरबान चव्हाण यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास चालू आहे.

Nanded News : नांदेड- लातूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री पोलिसांची नाकाबंदी

लातूर जिल्हा सीमेवर गस्त सुरू असताना चोरट्यांनी धुमाकूळ घालून वृद्ध पती-पत्नी यांना गंभीर जखमी केले. अंगावरील दागिने पळविल्याने पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी चोरट्यांनी दरोडा टाकला, हे घर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही  वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT