Nanded weather pudhari photo
नांदेड

Nanded weather : शहरात वाढत्या तापमानाचा दुष्काळात तेरावा महिना

उन्हाचे चटके आणि उकाड्याने नागरिक हैराण

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे उपहासाने म्हटले जाते. परंतु सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत तापमनात अचानक झालेली वाढ आणि उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यात काही काळ बंद असलेली एसी,कुलर घरोघरी पुन्हा सुरू झाले असून जिल्ह्याचे सरासरी तापमना ३३ अंशावर गेल्यामुळे दुपारनंतर उन्हाळ्याची अनुभूती येत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास जिल्ह्यात पाण्याचे भीषण संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जून, जुलैमध्ये झालेल्या अल्पशा पावसानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात पावसाचा खंड पडला. परिणामी दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. सोयाबीन, कापूस या पिकांसह संपुर्ण खरीप हंगाम उध्वस्त झाला आहे.शिवाय फळबागांही करपून गेल्या आहेत. शासनाने जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी मुदखेड आणि मुखेड ही दोन्ही तालुके दुष्काळी यादीत येण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

जिल्ह्यातील काही तालुक्यात कॅनॉलचे पाणी उपलब्ध असले तरी वाढत्या तापमानामुळे होणार्‍या बाष्पीभवनाने पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.त्यामुळे कॅनॉलमधील पाणीही अधिक काळ टिकण्याची शक्यता कमीच आहे. शेतामधील पाण्याच्या उपलब्धतेतून पिकांना जीवदान देण्याचा अटोकाट प्रयत्न शेतकरी करीत आहेत, परंतु उन्हाच्या वाढत्या तिव्रतेत पिके टिकाव धरतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

साधारणतः पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तापमानात अचानक वाढ होत असते. परिणामी वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असतो. यालाच ऑक्टोबर हीट असेही म्हटले जाते. परंतु यंदा पावसाळा झालाच नसल्यामुळे ऑक्टोबरमध्ये जाणवणारा उकाडा सप्टेंबरमध्येच सुरु झाला. जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणी साठाही अल्प प्रमाणात असून नदी-नाले पुर्णतः कोरडेठाक पडले आहेत. जनावरांना चारा- पाणी मिळणे कठीण झाले आहे. पिकांचे उत्पादनच झाले नसल्यामुळे यंदा महागाईच्या संकटालाही सामोरे जावे लागणार आहे.

  • हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये दोन वेळा पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता. परंतु हे दोन्ही अंदाज फोल ठरले. १२ दिवसांच्या गणेशोत्सवातही पावसाचे आगमन झाले नाही. आता पितृपक्षानंतर येणार्‍या नवरात्री महोत्सवात पाऊस पडेल,या आशेवर शेतकरी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT