Nanded Drought News : पावसाच्या खंडाचा पिकांवर परिणाम; पालकमंत्र्यांकडून सोयाबीनची पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर file photo
नांदेड

Nanded Drought News : पावसाच्या खंडाचा पिकांवर परिणाम; पालकमंत्र्यांकडून सोयाबीनची पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर

पळसगाव फाट्यावर सोयाबीनची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून दिला धीर

पुढारी वृत्तसेवा

Nanded Drought News: Dry spell affects crops; Guardian Minister inspects soybean fields, assures assistance

नायगाव : बाळासाहेब पांडे खरीप हंगामातील पिकांवर पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा गंभीर परिणाम झाला असून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी (दि. २७) नायगाव तालुक्यातील पळसगाव फाटा येथे शेतात जाऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची दयनीय अवस्था दाखवत उत्पादनातील घट आणि वाढलेला खर्च यांची कैफियत पालकमंत्र्यांसमोर मांडली.

राज्य शासनाने दि. २६ सप्टेंबर रोजी राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पिकांचे पंचनामे करून नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री सावे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

पळसगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक हातात घेऊन पालकमंत्र्यांना परिस्थिती दाखविली. वरून शेंगा दिसत असल्या तरी त्या आतून पोचट झाल्या असून, उत्पादन अत्यल्प होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाच्या खंडामुळे पिकाची झालेली अवस्था पाहून शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

यावेळी एका शेतकरी पुत्राने भावनिक होत, आतापर्यंत शेतीसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च झाले असून, सोयाबीन काढणीसाठी आणखी चार ते सहा हजार रुपये खर्च येणार आहे; मात्र शेतात शेंगाच नसल्याने हा खर्च कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर एमबीएच्या शिक्षणाची फी कशी भरायची, अशी व्यथाही त्याने पालकमंत्र्यांसमोर मांडली.

शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून पालकमंत्री अतुल सावे यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला. “शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्रांनी घाबरून जाऊ नये. शासन आपल्या पाठीशी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘पंचनामे करून अहवाल सादर करा’

पालकमंत्री सावे म्हणाले, “काही काळजी करू नका. कालच मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर केला आहे. सर्व पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.” दुष्काळामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या अडचणींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजेश पवार, भाजप जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, चैतन्य बापू देशमुख, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, माणिक लोहगावे, श्रीहरी देशमुख, धनंजय जाधव, बाबुराव ढगे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. श्याम पानेगावकर, तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, गटविकास अधिकारी टी. एन. वानखेडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहणीनंतर आमदार पवारांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

पालकमंत्र्यांच्या पीक पाहणीनंतर आमदार राजेश पवार यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

“यापूर्वी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही पाहणी केली आहे. आता पालकमंत्री अतुल सावे पाहणीसाठी आले आहेत. यावरून शासन नायगाव तालुक्यातील परिस्थितीकडे किती गांभीर्याने पाहत आहे, हे स्पष्ट होते,” असे आमदार पवार यांनी सांगितले.

तालुक्यातील पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, चारा आणि दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या अन्य अडचणींचे अचूक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासनाकडून शासनाला सादर होणारा अहवाल हा वस्तुस्थितीवर आधारित असावा, यावरही त्यांनी भर दिला.

मुख्यालय सोडू नका; पंचनाम्यात हलगर्जीपणा नको

तलाठी व ग्रामसेवकांच्या बैठका घेऊन गावनिहाय परिस्थितीचा आढावा घ्यावा. पीक पाहणी, सर्वेक्षण आणि पंचनाम्याच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

“सर्वेक्षणाच्या कामात कोणत्याही प्रकारची मागणी किंवा गैरप्रकार माझ्या निदर्शनास आल्यास त्याची गय केली जाणार नाही. टाळूवरचे लोणी कोणीही खायचे नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आतापासूनच सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दुष्काळी उपाययोजनांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती, कृषीपंपांच्या वीजबिलासंबंधी सवलती, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी तसेच पाणीपुरवठा व पशुधनासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश आहे.

‘शेतकरी पुत्रांनी घाबरून जाऊ नये’ “शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्रांनी घाबरून जाऊ नये. शासन आपल्या पाठीशी आहे.”
अतुल सावे, पालकमंत्री

पळसगाव फाट्यावर पीक पाहणी करताना शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेंगा पालकमंत्र्यांना दाखविल्या. वरून शेंगा दिसत असल्या तरी त्या पोचट झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एका शेतकरी पुत्राने एमबीएच्या शिक्षणाची फी कशी भरावी, असा सवाल करत आपली व्यथा मांडली. त्याची व्यथा ऐकून पालकमंत्री सावे यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT