विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाव्यवस्थापकांच्या तोंडी सूचनेवरून रुजू करून घेण्यात आलेले 35 उमेदवार (प्रशिक्षणार्थी) दीड दिवसाचे गणपती ठरले आहेत. त्यांना बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये अशाप्रकारे रुजू करून घेण्याची कृती आचारसंहितेचा भंग करणारी ठरेल, असे जिल्हा प्रशासनाने बजावल्यानंतर या सर्व उमेदवारांना बुधवारी घरी पाठविण्यात आले.
‘मनपा निवडणुकीच्या धामधूमीत जिल्हा बँकेमध्ये नोकरभरती!’ या मथळ्याखाली ‘दै.पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी त्वरेने दखल घेतली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा उप निबंधक आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनाही जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले. तेथे झालेल्या चर्चेतून बँकेमध्ये तोंडी आदेशावरून वेगवेगळ्या भागातील उमेदवारांना रुजू करून घेण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कृती आचारसंहितेचा भंग करणारी असल्याची जाणीव संबंधितांना करून देण्यात आली.
बँकेतील काही ‘भरतीवीर’ संचालकांच्या हट्टातून 45 जणांना कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया न करता प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करून घेतले जात असल्याची बाब समजल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश त्याचवेळी दिले.
त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी बुधवारी या विषयास प्राधान्य देत संबंधितांना पाचारण केले. बँकेतर्फे संबंधित अधिकाऱ्याने वस्तुस्थिती मांडली; पण महाव्यवस्थापकांनी तोंडी आदेशावरून उमेदवारांना रुजू करून घेतलेच नाही, असा पवित्रा घेतला होता. नंतर इतर वरिष्ठांनी रुजू झालेल्या उमेदवारांना ताबडतोब मुक्त करण्याचे मान्य केल्यानंतर हे प्रकरण तेथेच थांबल्याचे सांगण्यात आले. या विषयाचा एकंदर अहवाल बँकेच्या अध्यक्षांना कळविण्यात आल्यानंतर नव्याने घेतलेल्या उमेदवारांना ताबडतोब कार्यमुक्त करण्याचे आदेश त्यांनीही दिले.
जिल्हा बँकेमध्ये दीडशेहून अधिक पदे रिक्त असल्यामुळे बँकेच्या सर्वच शाखांमधील कारभार गतिमान राहिलेला नाही. अनेक दैनंदिन बाबींमध्ये अडचणी निर्माण होत आहेत ही वस्तुस्थिती असली, तरी जिल्हा बँकेतील काही संचालकांनी मागच्या दाराने आपल्या सोयीच्या उमेदवारांना बँकेमध्ये रुजू करून घेण्याचा जो प्रयत्न केला तो अत्यंत बेजबाबदार आणि बेकायदेशीर होता. तोंडी आदेशावरून रुजू झालेल्या उमेदवारांपैकी कोणी गडबड-घोटाळा केला असता, तर ठेवीदारांचा या बँकेवरील विश्वास उडाला असता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला हस्तक्षेप आणि त्यानंतर झालेली कारवाई स्वागतार्ह आहे.संदीपकुमार देशमुख बारडकर, तक्रारकर्ते