विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भाजपाला बहुमत आणि अध्यक्षपद मिळाले, तरी अद्याप याच पक्षाच्या सरकारने बँकेतल्या प्रस्तावित नोकर भरतीवरील स्थगिती मागे घेतलेली नाही. दुसर्या बाजूला बँकेच्या बिंदू नामावली (रोस्टर) प्रस्तावाचा नव्याने प्रवास सुरू झाला आहे.
बँकेच्या मागील संचालक मंडळातील काही प्रभावशाली संचालकांनी १५६ पदे भरण्यास शासनाची मान्यता मिळवली होती. त्यानंतर वरील मंडळाने ‘रोस्टर’ला मंजुरी नसतानाही मंजूर पदांमध्ये सर्व संचालकांचा ‘कोटा’ ठरवत भरती प्रक्रिया सुरू केली. त्यांतील भानगडी उघड झाल्यामुळे सहकार विभागाने चौकशी करून गेल्या ऑक्टोबरमध्ये नोकरभरतीस स्थगिती दिली.
तत्कालीन संचालक मंडळाचे मनसुबे उधळून लावण्यात खा.अशोक चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावतानाच बँकेतील नोकरभरती गुणवत्तेसह पारदर्शकतेने झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. अलीकडे संचालक मंडळाच्या निवडणुकीत चव्हाण यांनी लक्ष घालत बँकेची सत्ता आपल्या पक्षाच्या ताब्यात आणली.
भाजपा आमदार डॉ.तुषार राठोड हे बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनीही नोकर भरतीसंदर्भात गुणवत्तेचा आग्रह धरला. यादरम्यान बँकेच्या नव्या भरतीतील आरक्षण निश्चित करणारा बिंदू नामावली प्रस्ताव त्रुटींमुळे परत आला होता. निवडणूक झाल्यावर बँक प्रशासनाने त्यात आवश्यक ती दुरूस्ती करून हा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संबंधित विभागामध्ये सादर केला.
जिल्ह्यातल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर या बँकेच्या सर्व शाखांमध्ये कामांचा व्याप वाढलेला आहे; पण बँकेमध्ये मनुष्यबळ खूपच अपुरे असल्यामुळे अनेक अडचणी उद्भवल्या आहेत. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमुळे तब्बल एक महिना आचारसंहितेत गेल्यामुळे बँकेला नोकरभरतीबाबत कुठलीही प्रक्रिया करता आली नाही.
निवडणूक आचारसंहिता शनिवारी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर नोकरभरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. सरकारच्या नव्या परवानगीची आता सर्वांना प्रतीक्षा आहे. रोस्टरचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरहून सहकार आयुक्तांकडे व तेथून मंत्रालयात जातो. सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेनंतर तो अंतिम होतो, असे सांगण्यात आले.