Nanded District Central Cooperative Bank
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये हरिहरराव भोसीकर यांच्या निधनामुळे इतर मागासवर्ग (ओ.बी.सी.) मतदारसंघाच्या संचालकपदाची जागा रिक्त झाली असून ही जागा भरण्यासंदर्भात राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्र पाठविले आहे. पण या कार्यालयाने अद्याप बैठकीची सूचना जारी केलेली नाही.
हरिहरराव भोसीकर यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. तेव्हा ते बँकेचे उपाध्यक्षही होते. या रिक्त पदावर अन्य संचालकाची निवड करण्यासाठी वरील प्राधिकरणाच्या दि. २३ जूनच्या पत्रानसुसार जिल्हा उपनिबंधकांनी येत्या २२ जुलै रोजी संचालक मंडळाची बैठक अयोजित केली आहे.
पण भोसीकर यांचे रिक्त झालेले संचालकपद भरण्यासंदर्भात प्राधिकरणाने काहीही कळविले नव्हते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सहकार मंत्र्यांच्या कार्यालयाने बँकेतील रिक्त संचालकपद भरण्यासंदर्भात निवडणूक प्राधिकरणास कळविले गेले. त्यानंतर शुक्रवारी प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांस पत्र पाठवून संचालकपद भरण्याची सूचना दिली असून ते पत्र येथे प्राप्त झाले आहे.
प्राधिकरणाच्या वरील पत्रावर सोमवारी पुढील कार्यवाही अपेक्षित असून उपाध्यक्ष निवडीसाठी २२ जुलैला ठेवण्यात आलेल्या बैठकीआधी संचालकाची रिक्त जागा भरण्याची स्वतंत्र बैठक त्यापूर्वी घेण्यास वाव आहे, असे सांगण्यात आले.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मासिक सभा सोमवारी म्हणजे आज घेण्याचे आधी निश्चित झाले होते, पण ही सभा रद्द करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष मागील काही दिवसांपासून मुंबईत असून त्यांचा तेथील मुक्काम वाढल्यामुळे संचालक मंडळाची सभा रद्द करावी लागल्याची माहिती देण्यात आली.