नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सोमवारी पुन्हा सुरुवात झाली. आमदार तुषार राठोड श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मण ठक्करवाड, राजेश कुंटूरकर, प्रणीता देवरे यांच्यासह दुपारी तीन वाजेपर्यंत ८६ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले तर साडेचारशेहून अधिक नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे.
तीन दिवसांच्या शासकीय सुट्ट्यानंतर सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी तसेच अर्ज खरेदी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार व त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी बँकेच्या आवारात शामियाना व आसन व्यवस्था करण्यात आली होती.
गुरुवारपर्यंत २९६ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली होती. सोमवारी त्यात वाढ होऊन हा आकडा साडेचारशे च्या वर गेला आहे. मंगळवारी अर्जांची विक्री व अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले. सोमवारी ८४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून याआधी दोन अर्ज दाखल झाले होते.
तालुका स्तरावरील १६ आणि जिल्हास्तरावरील ७ जागांसाठी 28 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान १ जुलै रोजी अर्जांची छाननी आणि ३ ते १६ जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे १६ तारखेनंतरच या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरू केल्यामुळे बहुतांश जागा बिनविरोध निघतील असे संकेत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी शेवटची तारीख असल्यामुळे अनेक दिग्गज राजकारणी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारीच दाखल करतील अशी माहिती आहे. आमदार राजेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणार आहेत.
सोमवारी आमदार तुषार राठोड, श्रावण पाटील भिलवंडे, मारोतराव कवळे, संगीता पाटील डक, दिलीप पाटील बेटमोगरेकर, राजेश कुंटूरकर, लक्ष्मण ठक्करवाड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.