विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या आठवड्यामध्ये संपली. तत्पूर्वी या मंडळाची पंचवार्षिक निवडणूक घेण्यासाठी सहकार विभागाने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असली, तरी विद्यमान संचालक मंडळास ना मुदतवाढ ना प्रशासक अशी बँकेची सद्यस्थिती आहे.
बँकेचे विद्यमान संचालक मंडळ 4 एप्रिल 2021 रोजी कार्यरत झाले होते. या मंडळाचा कार्यकाळ 3 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात आला तेव्हा बँकेवर प्रशासक किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नियुक्त केले जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण याबाबत शासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे मंत्रालयातून सांगण्यात आले.
या संचालक मंडळाची मुदत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे, हे लक्षात घेऊन भाजपाच्या एका नेत्याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना गेल्या महिन्यात एक पत्र दिले. त्यात पुढील कालावधीकरिता बँकेवर प्रशासक मंडळ नेमण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केली; पण संचालक मंडळाची मुदत संपून एक आठवडा लोटला, तरी मंत्रालयातल्या सहकार विभागाकडून कोणताही आदेश निघालेला नाही किंवा विभागीय सह निबंधक कार्यालयाकडे त्याबाबत कोणतीही सूचना आलेली नाही, असे सांगण्यात आले.
संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी वरील कार्यालयाने या बँकेच्या मतदारांची यादी तयार करण्याची विहित प्रक्रिया सुरू केली. मतदारांची यादी या महिना अखेरपर्यंत पूर्ण व्हावी, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होणार, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर बँकेच्या कामकाजासंदर्भात बँक प्रशासनाने विभागीय सह निबंधकांकडे काही बाबींची विचारणा केली होती. मुदत संपलेल्या संचालक मंडळाची मासिक सभा घेता येते काय, असे विचारले गेले तेव्हा सभा घेता येईल, असे सह निबंधकांनी स्पष्ट केले होते. बँकिंग कायद्यातील नव्या दुरूस्तीनुसार वरील बँकेचे 8 विद्यमान संचालक पुढील निवडणूक लढविण्यास अपात्र समजले जात असले, तरी याबाबत सहकार विभागाने आवश्यक ते आदेश जारी केले नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते एका परिषदेनिमित्त वाराणसी येथे होते. बँकेवर प्रशासक किंवा प्रशासक मंडळ नेमण्यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.