नांदेड: काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्या समन्वयाच्या भूमिकेमुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी मुखेडचे माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बेटमोगरेकर हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असले, तरी बँकेमध्ये ते आमच्या गटाचे असल्याचे भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या गटाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा बँकेमध्ये सोमवारी शिवकुमार भोसीकर यांची संचालकपदी निवड झाल्यानंतर सर्वानुमते झालेल्या या निवडीचे श्रेय कोणत्याही राजकीय गटाने घेतले नाही. उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या गटाचा कौल बेटमो-गरेकर यांच्या बाजूने आधीच दिला होता, तरी भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी बँकेमध्ये बेटमोगरेकर हे आमच्या गटाचे आहेत, याकडे लक्ष वेधत दोन्ही निवडींमध्ये चिखलीकर यांना मोठेपणा किंवा श्रेय मिळू नये, याची दक्षता सोमवारी सकाळपासूनच घेतली. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २०२६ साली पूर्वार्धातच संपत असल्याने बेटमोगरेकर यांना उपाध्यक्ष म्हणून जेमतेम ८ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्या
संवत आणि सकारात्मक प्रयत्नांमुळे बेटमोगरेकरांचे राजकीय पुनर्वसन झाले, असे मानले जात आहे. त्यांचे काका माधवराव पाटील बेटमोगरेकर यांनी मागील काळात बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी (दि.22) सकाळी ११.०० वाजता उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बेटमोगरेकर यांनी दोन अर्ज भरले. त्यांच्या एका अर्जावर खा. अशोक चव्हाण समर्थक संचालक गोविंद-राव शिंदे नागेलीकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली व 'बेटमोगरेकर आमचेच' हे अधोरेखित केले, तर दुसऱ्या अर्जावर प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सूचक म्हणून सही केली. तत्पूर्वी भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी चव्हाण गटाच्या सर्व संचालकांना बेटमोगरेकरांच्या उमेदवारीबद्दल सुस्पष्ट कल्पना दिली होती.
बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे आता 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्षात असले, तरी बँकेमध्ये ते अशोक चव्हाण गटाचे प्रतिनिधी समजले जातात. बेटमोगरेकर यांच्या निवडीनंतर तशीच वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. अर्ज दाखल करणे व इतर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भरलेल्या संचालक मंडळाच्या सभेत बेटमोगरेकर यांच्या निवडीवर - शिक्कामोर्तब झाले. अध्यक्ष खतगावकर यांच्यासह खा. रवींद्र चव्हाण, खा. नागेश पाटील आष्टीकर व अन्य र संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले. नंतर बेटमोगरेकर यांनी उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
आ. चिखलीकर यांना बेटमोगरेकर यांच्या निवडीचे श्रेय मिळू नये, याची दक्षता भाजपाने मंगळवारी सकाळीच घेतली. अमरनाथ राजूरकर यांनी खा. अशोक चव्हाण गटाच्या सहा संचालकांस बेटमो गरेकरांसह एकत्र आणले आणि निवडीपू-वीच त्यांना पुष्पहार घालून गुलाल लावला. या प्रसंगाचे छायाचित्र नंतर समाजमाध्यमांतून सर्वत्र पसरले.
हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुपारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा. रवींद्र चव्हाण, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार तसेच श्याम दरक, एकनाथ मोरे, आनंद चव्हाण, राजेश पावडे, करुणा जमदाडे, महेश देशमुख, दिलीप पाटील बेटमोगरेकर प्रभृती उपस्थित होते.