Nanded District Bank  Pudhari
नांदेड

Nanded DCC Bank Election | नांदेड जिल्हा बँकेच्या मतदार यादीत शिवराज पाटील होटाळकर यांचे नाव समाविष्ट करण्याचे आदेश

विभागीय सहनिबंधकांचे आदेश : होटाळकर यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने मोठा वाद

पुढारी वृत्तसेवा

Nanded District Bank Election Voter List

नायगाव बाजार : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदार यादीवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच गडद झाला आहे. होटाळा (ता. नायगाव) येथील सेवा सहकारी संस्थेचे प्रतिनिधी तथा माजी संचालक शिवराज पाटील होटाळकर यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.

विभागीय सहनिबंधक (लातूर) तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश देत निवडणूक यंत्रणेलाच अप्रत्यक्षपणे चपराक लगावल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगू लागली आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून वैध नियुक्ती असतानाही शिवराज पाटील होटाळकर यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकारामुळे सहकार क्षेत्रात संतापाची लाट उसळली होती. संबंधित निर्णयाविरोधात होटाळकर यांनी अधिकृत हरकती नोंदवत आवश्यक पुरावे आणि कागदपत्रे निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केली होती.

या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ अंतर्गत घेण्यात आली. सुनावणीनंतर विभागीय सहनिबंधकांनी होटाळकर यांची नियुक्ती वैध असल्याचे स्पष्ट मान्य करत त्यांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश निवडणूक यंत्रणेला दिले आहेत. या आदेशामुळे निवडणूक प्रक्रियेत झालेल्या कथित त्रुटींवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, संस्थेच्या ठरावानुसार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झालेली असतानाही संबंधितांचे नाव गायब होणे ही केवळ प्रशासकीय चूक नसून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. “राजकीय दबावातून काही नावे डावलण्याचा प्रयत्न झाला काय?” असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे.

सहकार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या निवडणुकीत मतदार यादीतील पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत वैध प्रतिनिधीचे नाव वगळले जाणे ही गंभीर बाब मानली जात असून, यामुळे निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या आदेशानंतर सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांनाही वेग आला असून, आगामी निवडणुकीत या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पुढे रेटण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

New Doc 05-27-2026 16.13.pdf
Preview

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT