Nanded district bank election Pudhari photo
नांदेड

Nanded district bank election | जिल्हा बँकेच्या उमरखेड सोसायटी गटात लढत दुरंगीच! पण कोणाकोणात? सस्पेन्स कायम!

५२ मतदार... तीन देवसरकर... न्यायालयीन पेच; ‘देवसरकर’ नावाभोवती रंगले राजकारण

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यानंतर उमरखेड तालुका सोसायटी गटातील राजकीय चित्र अधिक गडद झाले आहे. या गटातून काँग्रेसचे राम देवसरकर, भाजपचे माजी आ. प्रकाश पाटील देवसरकर व नांदेडचे डॉ. अंकुश देवसरकर यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने सध्या वरकरवी तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असले तरी, लढत दुरंगीच असणार आहे. प्रकाश पाटील देवसरकर यांच्या उमेदवारीला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने अंतिम समीकरणावर न्यायालयीन निर्णयाची छाया कायम आहे. त्यामुळे अंतिम लढत कोणात होणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे.

उमरखेड तालुका सोसायटी गटात अवघे ५२ मतदार असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मोठ्या मतदारसंघापेक्षा वेगळ्या पद्धतीने या निवडणुकीत मतदारांची वैयक्तिक भूमिका, सोसायट्यांमधील प्रतिनिधींची बांधिलकी आणि शेवटच्या टप्प्यातील राजकीय जुळवाजुळव निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

प्रकाश पाटील देवसरकर हे सुमारे २८ वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर आहेत. यंदा त्यांनी पुन्हा उमरखेड सोसायटी गटातून उमेदवारी दाखल केल्याने सुरुवातीपासूनच या गटाकडे लक्ष लागले होते. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे राम देवसरकर यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे निवडणुकीचे राजकीय गणित केवळ मतदारांच्या निर्णयावरच नव्हे, तर न्यायालयीन निर्णयावरही अवलंबून राहणार आहे.

न्यायालयाचा निर्णय प्रकाश पाटील देवसरकर यांच्या बाजूने गेल्यास दुरंगी लढत राम देवसरकर व प्रकाश पाटील यांच्यात राहील. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत प्रतिकूल निर्णय झाल्यास डॉ. अंकुश देवसरकर हे भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात राहतील आणि काँग्रेसचे राम देवसरकर यांच्याशी त्यांची थेट लढत होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे उमरखेड गटाच्या निवडणुकीतील पुढील राजकीय दिशा न्यायालयीन निर्णयानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.

उमरखेडच्या सहकार क्षेत्रात देवसरकर कुटुंबाचे राजकीय अस्तित्व जुने आहे. राम देवसरकर यांचे वडील अॅड. अनंतराव देवसरकर हे बॅकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. दुसरीकडे दीर्घकाळ जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले प्रकाश पाटील देवसरकर, तर एका बाजूला काँग्रेसचे राम देवसरकर हे आहेत.

पर्यायी म्हणून डॉ. अंकुश देवसरकर अशी तीन नावे निवडणुकीच्या मैदानात आल्याने उमरखेड सोसायटी गटातील निवडणुकीला वेगळे राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. नव्या प्रतिनिधींची भूमिका आणि त्यांची राजकीय भूमिका निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची ठरू शकते.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासूनच तिन्ही बाजूंनी मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. कोणत्या सोसायटीचा प्रतिनिधी कोणाच्या बाजूने उभा राहतो, शेवटच्या क्षणी कोणते राजकीय समीकरण आकार घेते आणि न्यायालयीन निर्णय काय येतो, यावर उमरखेड गटातील पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.

दुहेरी लढत झाल्यास ५२ मतदारांच्या गटात विजयासाठी किमान २७ मतांचा आकडा गाठणे आवश्यक ठरेल. मात्र, तिरंगी लढत कायम राहिल्यास मतांचे विभाजन होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक मताचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे एकेका मतदाराची भूमिका आणि शेवटच्या टप्प्यातील जुळवाजुळव याकडे उमेदवारांसह समर्थकांचे लक्ष राहणार आहे.

उमरखेड सोसायटी गटातील ही निवडणूक केवळ ५२ मतदारांची असली तरी तिच्याशी जोडलेले राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरण मोठे आहे. न्यायालयीन निर्णय, उमेदवारांचे पक्षीय पाठबळ, नव्या प्रतिनिधींची भूमिका आणि अंतिम क्षणी होणारी मतांची जुळवाजुळव या चार घटकांवर या गटाच्या निवडणुकीचे चित्र ठरणार आहे.

त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमरखेड सोसायटी गटाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT