Madhavrao Patil Jawalgawkar win Pudhari
नांदेड

Nanded District Bank Election : हिमायतनगर गटातून माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर एका मताने विजयी

नांदेड जिल्हा बँक निवडणक; कार्यकर्त्यांकडून जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

Nanded DCC Bank Election Madhavrao Patil Jawalgawkar win

हिमायतनगर : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर झाला. हिमायतनगर गटातून शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अपक्ष उमेदवार विशाल राठोड यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव करून विजय संपादन केला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

या निवडणुकीत हिमायतनगर गटात चुरशीची लढत पाहायला मिळाली. माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विरोधात राजकीय पातळीवर विविध समीकरणे आखण्यात आल्याची चर्चा होती. उमेदवारीपासून ते निवडणूक प्रक्रियेपर्यंत अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेत निवडणूक लढवली. शेवटच्या टप्प्यात त्यांच्या गटातील दोन मतदारांनी साथ सोडल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.

निकालानुसार, माधवराव पाटील जवळगावकर यांना ११ मते, तर अपक्ष उमेदवार विशाल राठोड यांना १० मते मिळाली. विशाल राठोड यांनीही शेवटपर्यंत कडवी झुंज दिल्याने ही निवडणूक अत्यंत रंगतदार ठरली. अवघ्या एका मताने लागलेल्या निकालाची जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली आहे.

हिमायतनगर गटातील या विजयामुळे माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचे जिल्ह्यातील राजकीय स्थान अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

विजयानंतर जवळगावकर यांच्या समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला. विजयाच्या आनंदात परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT