Ramchandra Bharande Pudhari
नांदेड

Dharmabad To Mumbai Padyatra | चटणी-भाकरीच्या शिदोरीवर न्यायासाठी पायी लढा; धर्माबाद-मुंबई महापदयात्रेला वाढता जनाधार

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी धर्माबादहून मुंबईकडे निघालेल्या ‘न्याय संघर्ष महापदयात्रे’ला राज्यभरातून वाढता प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

Scheduled Caste Reservation

धर्माबाद : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी धर्माबादहून मुंबईकडे निघालेल्या ‘न्याय संघर्ष महापदयात्रे’ला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून सामाजिक न्यायाच्या या आंदोलनाने लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. मार्गातील विविध गावांमध्ये आयोजित जनजागृती सभा, बैठका आणि संवाद कार्यक्रमांद्वारे उपवर्गीकरणाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे.

लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या पदयात्रेला सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी पदयात्रेतील कार्यकर्त्यांचे चटणी-भाकरी देऊन स्वागत केले. संघर्षाच्या वाटेवर मिळालेली ही साधी शिदोरी आंदोलनकर्त्यांसाठी प्रेरणा, आत्मीयता आणि उर्जेचा स्रोत ठरत आहे.

पदयात्रेच्या मार्गावर नागरिकांकडून आर्थिक मदतीचाही ओघ सुरू असून सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी समाजबांधव स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. लाभवंचित घटकांना आरक्षणातील न्याय्य वाटा मिळावा, ही भावना आता व्यापक जनआंदोलनात रूपांतरित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

"उपवर्गीकरणाची मागणी कोणत्याही समाजाविरोधातील संघर्ष नसून वंचित घटकांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा अखंड सुरू राहील," असा निर्धार पदयात्रेच्या नेतृत्वाने व्यक्त केला.

गावोगावी मिळणारा प्रतिसाद, वाढता लोकसहभाग आणि जनतेचा विश्वास यामुळे उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.

या महापदयात्रेत लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष व्ही. जी. डोईवाड, रावसाहेब पवार, धोंडूपंत बनसोडे, नागोराव कुडके, एम. जे. पिंगळे, बी. एम. गोणारकर, लक्ष्मण निदानकर, नागोराव कमलाकर, पत्रकार सुरेश घाळे, जी. आर. गोणारकर, नारायण इबितवार, बाबुराव गोणारकर, शिवराम भंगारे, देवराव निदानकर, सुरेश निदानकर, अनिल गोणारकर, ऐश्वर्या गायकवाड यांच्यासह महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हलगीच्या गजरात महापदयात्रेला उत्साहपूर्ण प्रारंभ

धर्माबाद शहरातील साठेनगर परिसरातून न्याय संघर्ष महापदयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. हलगीच्या तालावर नृत्य, घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या मागण्यांचा जोरदार जयघोष केला. पदयात्रेच्या प्रारंभापासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

संघर्षाची खरी ताकद ठरली चटणी-भाकरी

महापदयात्रेच्या मार्गावरील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी चटणी-भाकरी देऊन आंदोलनकर्त्यांचे स्वागत केले. साध्या अन्नातून व्यक्त झालेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी हीच संघर्षाची खरी ताकद असल्याची भावना सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. "समाजबांधवांनी दिलेली चटणी-भाकरी हीच आमच्या लढ्याची खरी शिदोरी आहे," असे त्यांनी सांगितले.

६ जुलै रोजी आझाद मैदानावर एल्गार

धर्माबाद येथून सुरू झालेली ही न्याय संघर्ष महापदयात्रा ६ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहे. त्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या एल्गार मोर्चामध्ये मातंग समाजासह सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT