Nanded DCC Bank Election pudhari photo
नांदेड

Nanded DCC Bank election : नव्यांचे धोरण; बँक निवडणुकीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे तोरण!

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय प्रस्थापित नेते एकवटत असल्याचे चित्र

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय प्रस्थापित नेते एकवटत असल्याचे चित्र तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश करू पाहणार्‍या नवोदितांचे धोरण बुधवारी ठरणार असल्याचे समजते. या निवडणुकीमध्ये ज्यांच्या आशा-आकांक्षांवर गंडांतर आणले जात आहे, अशांपैकी काहींनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे तोरण बांधण्याचा विचार चालवला आहे.

काँग्रेसचे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी ‘क’ (बिगर शेती सहकारी संस्था) मतदारसंघातून स्वतंत्रपणे अर्ज भरला असून सर्वपक्षीय नेत्यांनी काहीही समझोता केला, तरी निवडणूक लढविण्याची राजकीय तयारी त्यांनी केली असल्याचे सांगण्यात आले. या मतदारसंघातील बहुसंख्य मतदारांशी त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

वरील मतदारसंघात माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर यांचे पुत्र मुकेश टाकळीकर यांच्यासह एकंदर १७ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. पण नेत्यांनी नव्यांना संधी देण्याऐवजी ज्यांची इतरत्र सोय होऊ शकत नाही त्यांतील एकास या मतदारसंघात उभे करण्याचा विचार चालवला असल्याच्या पार्श्वभूमीवर बेटमोगरेकरांसह टाकळीकर यांनीही प्रस्थापितांविरुद्ध लढण्याचा पवित्रा घेतला आहे. अशीच भूमिका ‘ब’ मतदारसंघातील गजानन पांपटवार यांनीही घेतली असल्याचे दिसून आले. मंगळवारच्या एका बैठकीसाठी त्यांना बोलविण्यात आले होते; पण या बैठकीकडे पांपटवार यांनी पाठ फिरवली.

एका उपरोधातून तसेच अस्वस्थतेतून ‘कॉकरोच जनता पार्टी’चा देशभर गाजावाजा झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रस्थापितांसमोर याच पार्टीच्या नावाखाली आव्हान उभे करण्याचा मुद्दा मंगळवारी समोर आला. त्याअनुषंगाने बुधवारी काही इच्छुक उमेदवार एकत्र येऊन पुढील निर्णय घेणार आहेत.

जिल्हा बँक निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती ठेवणार्‍या नेत्याने तयार केलेल्या सूत्रामध्ये सर्व प्रस्थापितांना सामावून घेतले जात आहे. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांना बँकेमध्ये येण्यासाठी वाव राहिलेला नाही. आमदार-खासदारांनाही स्वतःला किंवा आपल्या परिवारातील सदस्यालाच बँकेमध्ये आणायचे आहे. यातील अनेकांचे लक्ष पुढील काळातल्या नोकरभरतीकडे आहे. काहींनी लक्ष्मीदर्शनाचा प्रयोग सुरू केला.

काहींनी मतदारांना आपल्या ताब्यात घेऊन ठेवले आहे, तर काहींनी मतदारांना सहलीवर पाठविले आहे. प्रस्थापितांच्या या खटाटोपांना आव्हान देता येईल काय, याची चाचपणी सुरू आहे असे सांगण्यात आले.

जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस, भाजपासह सर्व प्रस्थापित पक्षांनी सामान्य शेतकरी व विस्थापित उमेदवारांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी एकजूट दाखवून लोकशाही मार्गाने त्यांना उत्तर दिले पाहिजे. माझा काका, मामा-मामी, पत्नी, मुलगी आणि मुलांपुरतेच जिल्हा बँकेचे संचालकपद मर्यादित राहू नये. आगामी नोकरभरती आणि बँकेचा पारदर्शक कारभार लक्षात घेता सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे. काँग्रेसमधील सामान्य उमेदवारांप्रमाणेच कॉकरोच जनता पार्टीकडूनही विस्थापित उमेदवार निवडणूक लढवत असतील, तर ती स्वागतार्ह बाब आहे. प्रस्थापितांना पर्याय उभा करणे हेच लोकशाहीचे खरे बळ आहे.
संदीप देशमुख बारडकर, काँग्रेस कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT