Nanded DCC Bank pudhari photo
नांदेड

Nanded DCC Bank election : ‘अ’ मतदारसंघातील बहुसंख्य जागांवरील उमेदवार निश्चित!

दोन आमदारांसह कवळे, कदम यांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील ‘अ’ (कृषी पतपुरवठा, वि.का.सेवा व धान्य अधिकोश सहकारी संस्थांचे प्रतिनिधी) मतदारसंघातील १६ जागांपैकी बहुसंख्य जागांवरील उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांनी जवळपास निश्चित केले आहेत. त्यामध्ये दोन आमदार, एक माजी आमदार यांच्यासह मारोतराव कवळे (उमरी), बालाजी रामजी कदम (अर्धापूर), मीनल निरंजन पाटील (बिलोली) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

वरील बँकेच्या संचालक मंडळावर आपला वरचष्मा राखण्यासाठी खा.चव्हाण यांनी वेगवेगळ्या गटांच्या प्रमुखांशी, अर्ज भरलेल्या उमेदवारांशी वेगवेगळ्या सत्रांमध्ये चर्चा केली. ज्या ठिकाणी मोठे पेच होते, ते चर्चेतून दूर करण्यात आले. त्यातून माधवराव जवळगावकर (हिमायतनगर तालुका), डॉ.तुषार राठोड (मुखेड तालुका), कृष्णा नागेश पाटील (हदगाव) यांची नावे निश्चित झाली. नायगाव, देगलूर येथील पेच अद्याप सुटलेला नाही.

खा.चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील भोकर व मुदखेड या दोन जागांवर कोणाची उमेदवारी निश्चित करायची, ही बाब त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे. कंधार व लोहा या दोन्ही जागा आ.चिखलीकर यांना सोडल्या जाऊ शकतात. धर्माबाद तालुक्याच्या जागेसाठी कवळे यांच्या पत्नी सागरबाई यांचे नाव विचाराधीन असल्याचे समजते.

चव्हाण यांनी मागील आठवड्यात काही बैठका घेतल्या; पण सोमवारी सकाळी त्यांना तातडीने हैदराबादमार्गे मुंबईला एका बैठकीसाठी जावे लागल्यामुळे दिवसभरात बँक निवडणुकीसंदर्भात फार हालचाली झाल्या नाहीत. तथापि महिलांसाठी असलेल्या दोन राखीव जागांवर तोडगा निघाल्याची चर्चा संबंधितांमध्ये सुरू होती. आ.राजेश पवार यांनी आपली सहचारिणी पूनम यांच्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्यानंतर त्यांच्यासह माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई बेटमोगरेकर या दोघांची नावे ठरल्याचे सांगण्यात आले.

‘अ’ मतदारसंघातील नायगाव आणि देगलूर येथील उमेदवारांसंदर्भात अद्याप तोडगा निघालेला नाही. किनवट तालुक्यातून आ.भीमराव केराम, माहूर तालुक्यातून राजेंद्र केशवे यांचेही नाव निश्चित असल्याचे मानले जात आहे. नागरी बँका व पतसंस्था तसेच पगारदार नोकरांच्या पतसंस्था या ‘ब’ वर्गातील मतदारसंघामध्ये ११ उमेदवार आहेत. या मतदारसंघातील शिवराम लुटे यांचे नाव चव्हाण गटातर्फे आधी निश्चित मानले जात होते; पण या जागेवरचा पेच कायम आहे. बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर यांच्या पारंपरिक मतदारसंघात (बिगर शेती) १७ उमेदवार असून त्यात काही दिग्गजांचा समावेश आहे. या मतदारसंघाचाही पेच कायम आहे.

भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघात दिनकर दहिफळे यांचे बंधू ज्ञानेश्वर यांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसींच्या मतदारसंघात खा.अजित गोपछडे यांनी आपल्या भावासाठी दावा केला असला, तरी चव्हाण गटाकडून शिवकुमार भोसीकर यांचे नाव विचाराधीन आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी मतदारसंघात रामचंद्र विठ्ठलराव मुसळे यांना विश्रांती देऊन लक्ष्मण गंगाराम ठक्करवाड यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT