खा.अशोक चव्हाण जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार? pudhari photo
नांदेड

Nanded DCC Bank Election : खा.अशोक चव्हाण जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार?

व्यक्तिगत सभासद यादीत नाव असतानाही येळेगाव सोसायटीतून चव्हाणांच्या नावाचा ठराव

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्धापूर तालुक्यातील येळेगाव सेवा सहकारी सोसायटीने आपला प्रतिनिधी म्हणून खा.अशोक चव्हाण यांची एकमताने निवड केल्यानंतर ते बँकेच्या निवडणुकीत उतरण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळविण्याचाही वाव असल्याचे मानले जात आहे.

खा.चव्हाण मागील अनेक वर्षांपासून बँकेचे व्यक्तीगत सभासद आहेत; पण या बँकेच्या प्रदीर्घ इतिहासात चव्हाण कुटुंबातून कोणीही या बँकेच्या संचालकपदाची निवडणूक आजवर लढविली नाही, असे दिसते. गेल्या शतकाच्या अखेरीस या बँकेला लागलेली घरघर पाहून (कै.) शंकरराव चव्हाण यांनी तर या बँकेतील आपले खातेही बंद केले होते. त्यांच्या पश्चात अशोक चव्हाण यांनीही बँकेची निवडणूक कधीच लढविली नाही. मागील निवडणुकीत त्यांनी एका गटाचे नेतृत्व करून या बँकेवर आपला वरचष्मा निर्माण केला होता. तसेच त्यांच्यामुळेच आधी वसंतराव चव्हाण आणि मग भास्करराव खतगावकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली.

आता नजीकच्या काळात होणाऱ्या बँकेच्या निवडणुकीतून खतगावकर यांच्यासह आ.प्रताप पाटील चिखलीकर, मोहन पाटील टाकळीकर, दिनकर दहिफळे आदी दिग्गज ‌‘बाद‌’ होणार आहेत. संचालक मंडळावर काही विद्यमान संचालकांसह नव्यांनाही संधी आहे; पण बँकेचे नेतृत्व सक्षम नेत्याकडे असावे, या दृष्टीने सर्वप्रथम खा.अशोक चव्हाण यांचे नाव घेतले जात आहे.

2005 ते 2025 ही 20 वर्षे या बँकेसाठी अतिशय खडतर ठरली होती. संचित तोटा फार मोठ्या प्रमाणावर वाढला होता; पण आता ही बँक संचित तोट्यातून बाहेर आली आहे. तसेच नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षअखेर बँकेच्या निव्वळ नफ्यात घसघशीत वाढ झाली असून या संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी बँकेचे नेतृत्व जाणत्या व कार्यक्षम व्यक्तीकडे असावे, या दृष्टीने चव्हाण यांच्या नावाची चर्चा होत आहे.

खा.चव्हाण हे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते; पण आपला हा कालावधी संपल्यानंतर त्यांनी कारखान्यामध्ये आधी आपल्या पत्नी अमिता चव्हाण यांच्यावर काही वर्षे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. आता त्यांचे पुतणे नरेन्द्र चव्हाण हे या कारखान्याचे नेतृत्व करत आहेत. या कारखान्याच्या मागील काही निवडणुकांमध्ये चव्हाण यांनी स्वतः भाग घेतला नाही; पण आपल्या विचारांचे संचालक कारखान्यावर निवडून आणले.

जिल्हा बँकेच्या मतदारयादीत खा.अशोक चव्हाण यांचे नाव व्यक्तीगत सभासदांच्या यादीत आधीपासून समाविष्ट आहे. या नात्याने निवडणूक लढविण्याची संधी त्यांना पूर्वीही होती. पण त्यांनी आजवर या बँकेची निवडणूक लढविणे टाळले होते. आता अर्धापूर तालुका सेवा सहकारी व इतर संबंधित संस्था मतदारसंघाच्या मतदार यादीसाठी येळेगाव सोसायटीतर्फे त्यांच्या नावाचा ठराव जाणीवपूर्वक घेतला गेल्यामुळे ते बँकेच्या निवडणुकीत उतरले, तर त्यांची बिनविरोध निवड होऊ शकते, असे सांगण्यात आले. यासंदर्भात चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

देगाव सोसायटीतून गणपतराव तिडके!

जिल्हा बँक निवडणुकीसाठी येळेगाव सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून पूर्वी सदाशिव कपाटे यांचे नाव होते. आताही त्यांचीच इच्छा होती; पण या सोसायटीतील काही ज्येष्ठ संचालकांनी खा.अशोक चव्हाण यांचे नाव पुढे केल्यामुळे सदाशिव कपाटे यांना माघार घ्यावी लागली. या सोसायटीच्या 13 संचालकांपैकी 11 संचालक बैठकीस उपस्थित होते. त्यांतील सुरेश सोनाजी कपाटे (सदाशिव यांचे वडील) यांनी चव्हाणांच्या नावास अनुमोदन दिले. येळेगाव लगतच असलेल्या देगाव येथील सेवा सहकारी सोसायटीमध्ये भाऊराव चव्हाण कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव तिडके यांच्या नावाचा ठराव पारित करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT