Nanded DCC Bank pudhari photo
नांदेड

Nanded DCC Bank : मुहूर्त ठरला..जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष-उपाध्यक्षांची १०ला निवड!

बँकेच्या मुख्यालयात १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचा झेंडा नव्या अध्यक्षांच्या हस्ते फडकवता येणार

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या संचालकांच्या निवडीची अधिसूचना ३ ऑगस्ट रोजी जारी होताच, निर्वाचित संचालकांतून अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१०) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नियोजित सभेची सूचना बुधवारी काढण्यात आली. तत्पूर्वी काही नेते आणि संचालकांची सोय पाहून १० ऑगस्ट ही तारीख निश्चित झाली. जिल्हा उप निबंधक शाहूराज हिरे हे या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर या बँकेवरील ‘प्रशासकराज’ संपुष्टात येणार असून बँकेच्या मुख्यालयात १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचा झेंडा नव्या अध्यक्षांच्या हस्ते फडकवता येणार आहे.

दरम्यान बँकेतल्या बहुमतातील २१ नव्या संचालकांचे प्रमुख नेते खा.अशोक चव्हाण गुरुवारी नांदेडमध्ये दाखल होणार असून त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका आणि चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होईल, असे सांगण्यात आले. मागील राजवटीमध्ये बँकेमध्ये आधी वसंतराव चव्हाण आणि नंतर भास्करराव पाटील खतगावकर यांनी अध्यक्षपद भूषविले होते. त्यातून नायगाव आणि बिलोली तालुक्याला संधी मिळाली.

आता नव्या संचालक मंडळात खा.चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील चार संचालक आहेत. त्यांतील ज्येष्ठ नेते बी.आर.कदम यांचे नाव चर्चेत आहे, तर उमरी तालुक्याचे मारोतराव कवळे हेही अध्यक्षपदाचे एक दावेदार आहेत. दोन्ही पदांच्या उमेदवारांचे नाव निश्चित करण्याचे सर्वाधिकार खा.अशोक चव्हाण यांना दिले जातील आणि नंतर ते नावे जाहीर करतील, अशी नेपथ्यरचना होण्याची शक्यता आहे.

बँकेच्या संचालक मंडळामध्ये प्रथमच ५ महिला निवडून आल्या असून त्यातील चौघी खा.चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या आहेत. या महिलांतून कोणाची उपाध्यक्षपदी वर्णी लागते का, याकडे संबंधितांचे लक्ष आहे. अध्यक्षपद भाजपाच्या संचालकाकडे गेल्यानंतर दुसरे पद मित्रपक्षांना दिले जावे, अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे.

या दोन्ही पक्षांकडे उपाध्यक्षपदासाठी महिला संचालक आहेत. बँकेच्या संचालक मंडळामध्ये महिलांना स्थान देण्याची सुरुवात सुमारे ३० वर्षांपूर्वी झाली; पण आजवर या बँकेत एकाही महिलेला मानाचे पद मिळालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT