

पैठण : जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे मंगळवारी (दि.४) सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटाने अर्धा फूट उघडून गोदावरी नदीपात्रात १० हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरवाजे उघडून गोदापात्रात विसर्ग करण्याची ही धरणाच्या इतिहासातील सतरावी वेळ तर सलग चौथी वेळ आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या नोंदीनुसार जायकवाडी धरणात ९१.६२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. धरणाची पाणीपातळी १५२०.४६ फूट म्हणजेच ४६३.४३६ मीटर इतकी नोंदविण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यासह जायकवाडीच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे नियंत्रित स्वरूपात विसर्ग करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला.
जयंत गवळी कार्यकारी संचालक गोदावरी विकास महामंडळ, नामदेवराव खराद, कार्यकारी अभियंता गणेश हसे, राजेंद्र धोडपकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून दरवाजे उघडण्यात आले.
धरणाचे १० ते २७ क्रमांकाचे दरवाजे अर्धा फूट उचलून प्रत्येकी ५२० क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने गोदावरी नदीच्या पात्रात १० हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्ग सुरू करण्यापूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी करून सर्व यंत्रणेची तपासणी केली. उजव्या कालव्यातून १ हजार क्यूसेक व डाव्या कालव्यातून ७०० क्यूसेक, असा एकूण १ हजार ७०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. मात्र वरील धरणसमूहातून सुरू असलेल्या प्रचंड आवकमुळे धरणात पाणीसाठा वाढला.
सायंकाळी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची वेळ आली. जायकवाडी धरण ९१.६२ टक्क्यांवरून पूर्ण क्षमतेकडे वेगाने जात असून, सध्या धरणात ४३ हजार ३०१ क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.
सतर्कतेचा इशारा
धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीच्या पात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात अनावश्यक वावर टाळावा, जनावरे व साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार व जायकवाडी धरण प्रशासनाने केले आहे.