विशेष प्रतिनिधी
नांदेड :नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर खा.अशोक चव्हाण यांनी प्रथमच भाजपाचे १४ संचालक निवडून आणल्यानंतर पक्षात ‘आनंदी-आनंद गडे’ असे वातावरण तयार झालेले असतानाच बँकेतील भाजपाचे संख्याबळ आणखी दोनने वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये आणखी एक नाव समोर आणले जात आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे निकाल गेल्या मंगळवारी (दि.२८) लागला. तत्पूर्वी खा.अशोक चव्हाण येथून मुंबईला आणि तेथूनच संसद अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर बँकेतील पक्षीय बलाबलाचे विश्लेषण केले जात असताना बँकेचे अध्यक्षपद भाजपाच्या संचालकाकडे तर उपाध्यक्षपद मित्रपक्षाकडे जाण्याची चर्चा सुरू झाली; पण भाजपाच्या संचालकांमध्ये आणखी दोघांची भर पडणार असल्याची नवी चर्चा सुरू झाली असून दोन्ही पदे भाजपाकडेच ठेवली जाण्याची शक्यता वाढली आहे.
वरील दोन्ही पदांच्या निवडीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. खा.चव्हाण यांनी शनिवार-रविवारच्या सुटीदरम्यान नांदेडला येण्याचेही टाळल्यामुळे वरील दोन पदांच्या संभाव्य उमेदवारांसंबंधीची चर्चा पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर गेली. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख निश्चित होण्यापूर्वीच दोन अन्यपक्षीय संचालक भाजपात प्रवेश करणार असल्याची नवी चर्चा समोर आली.
अध्यक्षपदासाठी अनुभवी मारोतराव कवळे आणि ज्येष्ठ संचालक बी.आर.कदम यांची नावे सर्वप्रथम चर्चेत आल्यानंतर समाजमाध्यमांतील प्रतिक्रियांमध्ये कवळे यांच्या नावाला मोठी पसंती दिसून आली; पण संबंधितांत काही नव्या घडामोडी सुरू आहेत. अध्यक्षपदासाठी एका महिला संचालिकेचे नावही पुढे आणले जात आहे. एक माजी आमदारही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्यामुळे या पक्षाचे बँकेतील संख्याबळ १६ वर जाईल.