Gram panchayat news pudhari photo
नांदेड

Nanded Gram Panchayat News: दहेली तांड्यातील राजकीय घडामोडींना कलाटणी; उपसरपंच जाधव यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव रद्द

जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांचा महत्त्वपूर्ण आदेश; १५ मेची सभा व कार्यवाही ठरविली अवैध

पुढारी वृत्तसेवा

सारखणी : किनवट तालुक्यातील दहेली तांडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच दारासिंग नानू जाधव यांच्याविरुद्ध आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी २५ जुलै २०२६ रोजी आदेश पारित करून १५ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली विशेष सभा तसेच अविश्वास प्रस्तावासंदर्भातील संपूर्ण कार्यवाही कायदेशीर त्रुटींमुळे अवैध ठरविली आहे. त्यामुळे उपसरपंच दारासिंग जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उपसरपंच दारासिंग नानू जाधव यांनी किनवट तहसीलदारांच्या कारवाईविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या कारणांवर विशेष सभेत योग्य प्रकारे चर्चा करण्यात आली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. तसेच उपसरपंचांना आपली बाजू मांडण्याची व आरोपांबाबत स्वतःचे म्हणणे स्पष्ट करण्याची संधी देण्यात आली नसल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणातील कागदपत्रे, सभेचे इतिवृत्त व उपलब्ध पुराव्यांची छाननी केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी १५ मे रोजी झालेली सभा व त्यातील अविश्वास प्रस्तावाची कार्यवाही कायदेशीरदृष्ट्या विधीग्राह्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार दारासिंग जाधव यांचा विवाद अर्ज मंजूर करून संबंधित सभा व अविश्वास प्रस्तावाचे कामकाज अवैध ठरविण्यात आले. या निर्णयामुळे दहेली तांडा ग्रामपंचायतीतील राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळाली असून, उपसरपंच दारासिंग जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उपसरपंच दारासिंग जाधव यांच्या बाजूने ॲड. एन. जे. काकडे यांनी काम पाहिले. “मी गावातील सर्व नागरिकांची कामे करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यावर करण्यात आलेले आरोप निरर्थक होते. अखेर या प्रकरणात मला न्याय मिळाला,” अशी प्रतिक्रिया उपसरपंच दारासिंग जाधव यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT