नांदेड

Nanded crime | जुगाराच्या वादातून युवकाची चाकूने भोसकून हत्या

घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली

पुढारी वृत्तसेवा

हदगाव : तालुक्यातील मौजे निवघा येथे जुगाराच्या डावावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित हाणामारीत होऊन एका २४ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निघृण हत्या करण्यात आल्याची धकादायक घटना घडली आहे. विजय नारायण कदम (वय २४, रा.निवघा) असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणी हदगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी (दि.३१) रात्री साडेआठच्या सुमारास निवघा येथील नवी आबादी अण्णाभाऊ साठे चौक परिसरात काही युवक पत्त्यांचा जुगार खेळत होते. यावेळी विजय कदम याच्याजवळील रोख रक्कम संपल्याने त्याने सोबतच्या व्यक्तींना मी ऑनलाइन पैसे पाठवतो, तुम्ही मला रोख रक्कम द्या अशी विनंती केली. मात्र, याच आर्थिक व्यवहारावरून उपस्थितामध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. क्षणात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी अब्दुल शेख मुजीब, शाहिद पठाण, तब्बू शेख (रा.उमरखेड जि.यवतमाळ) तसेच त्यांच्या एका साथीदाराने विजय कदम याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान,आरोपी शाहिद पठाण याने जवळील धारदार चाकू काढून विजयवर सपासप वार केले. पोटावर व शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर वार झाल्याने विजय गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आहे. त्यास रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमी विजयला तातडीने उपचारासाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र,उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 3 (बीएनएस) कलम १०३ /२ (११८ (२) ३५० अन्वये गुन्हा दाखल आला आहे. पुढील तपास साय्यक पोलीस निरक्षक दिगांबर पाटील करित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT