Nanded Crime Pudhari
नांदेड

Nanded Crime: 'पप्पा, मला वाचवा...' ही आर्त हाक त्याच्या कानी पडली नाही; निवडणुकीपोटी मुलीचा काटा काढणाऱ्या बापाबद्दल संताप

बापाने ओलांडली क्रौर्याची सीमा; नराधम बापाबद्दल समाजमनातून संताप

पुढारी वृत्तसेवा

nanded crime news father murder his daughter

संतोष जोशी

नांदेड : पप्पा... पप्पा, मला वाचवा... ही आर्त हाक त्या निर्दयी बापाच्या कानी पडली नाही. राजकीय महत्त्वाकांक्षेच्या वेदीवर अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीचा बळी देण्यात आला. मुखेड तालुक्यातील केरुर येथील या घटनेने माणुसकीला काळीमा फासला असून, केवळ निवडणुकीत अपात्र ठरण्याच्या भीतीपोटी पोटच्या मुलीचा काटा काढणाऱ्या या पाषाणहृदयी बापाबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

मुखेड तालुक्यातील केरुर येथील पांडुरंग कोंडामंगले याचे शहरात 'विराट मेन्स पार्लर' नावाने मोठे दुकान आहे. हाताला काम आणि घरात सुख-शांती होती. त्याला दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये होती. मात्र, केरुरचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आणि इथेच त्याच्या सुखी संसाराला दृष्ट लागली.

गावातील पॅनल प्रमुख गणेश शिंदे याने पांडुरंगला हेरले. तुझ्या बायकोला सरपंच करतो, निवडणुकीसाठी १५ लाख रुपये देतो आणि सर्व मदत करतो, असे आमिष शिंदेने दाखवले. मात्र, तीन अपत्ये असल्याने निवडणूक लढवता येणार नाही, हा नियम आडवा आला.

यावर तोडगा काढण्यासाठी पांडुरंगने सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचा किंवा मुलाचा जन्मदाखला लपवण्याचा प्रयत्न केला. वर्षभरापासून त्याच्या डोक्यात सरपंचेपदाचे भूत नाचत होते. पण कायदेशीर पळवाट सापडत नसल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले.

स्वतःची राजकीय भूक भागवण्यासाठी त्याने पोटच्या मुलीचा बळी देण्याचे ठरवले. २९ जानेवारीला त्याने जुळ्या बहिणींपैकी प्राचीला (वय ६) द्वाकीवर बसवले. तेलंगण्यातील येडपल्ली येथील निजामसागर कालव्याजवळ नेऊन तिला निर्दयपणे पाण्यात फेकून दिले. ती चिमुकली पप्पा.. पप्पा म्हणून ओरडत होती, पण बापाचे काळीज पाझरले नाही. गुन्हा करून आपण सुटलो, या भ्रमात तो होता. पण तेलंगणा पोलिसांनी तपास करत त्याला आणि त्याला फूस लावणाऱ्या गणेश शिंदेला गजाआड केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT