Life Imprisonment Pudhari
नांदेड

Nanded crime: अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार; आरोपीस उर्वरित आयुष्य आजन्म कारावासाची शिक्षा

दोन वर्षे हे प्रकरण न्यायालयात चालले असता एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

मुखेड : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून माळरानावरील शेतात नेऊन विनयभंग व लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी मुखेड पोक्सो न्यायालयाने आरोपीस उर्वरित संपूर्ण आयुष्य आजन्म कारावासाची व दंडाची शिक्षा ठोठावली.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, एका गावातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना आरोपी मल्हारी चांदु गुमडे (रा. दापका, ता. मुखेड) याने पीडितेस ‘खाऊ देतो, माझ्यासोबत चल’ असे म्हणत तिला माळरानावरील शेतातील झोपडीत नेले. तेथे त्याने दारू पिऊन पीडितेचा विनयभंग केला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडिता झोपडीतून गावाजवळील रस्त्यावर आली असता एका व्यक्तीस तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. सदर व्यक्तीने पीडितेच्या गावात माहिती दिली. त्यानंतर तिचे वडील, नातेवाईक व इतर साक्षीदार शेतातील झोपडीत गेले असता तेथे आरोपी मल्हारी चांदु गुमडे हा दिसून आला.

या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 83/2024, कलम 363, 354, 354 (अ), 376 (1) भादंवि, तसेच कलम 4, 6, 8, 12 बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सी.आय. सय्यद यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन वर्षे हे प्रकरण न्यायालयात चालले असता एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल व विशेष सरकारी अभियोक्ता गजानन भिकाजी खिल्लारे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मा. श्री. एस.पी. देशमुख यांनी 19 ऑगस्ट 2026 रोजी आरोपी मल्हारी चांदु गुमडे यास 9 गुन्ह्यात दोषी धरले.

कलम 6 पोक्सो अ‍ॅक्ट अन्वये उर्वरित संपूर्ण आयुष्य आजन्म कारावासाची शिक्षा व 20,000 रुपये दंड, तसेच कलम 363 भादंवि अन्वये 3 वर्षे कारावासाची शिक्षा व 5,000 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पीडितेस महाराष्ट्र शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडे शिफारस करण्यात आली.

या प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता गजानन भिकाजी खिल्लारे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून मुक्रमाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राजरत्न वाघमारे यांनी सहकार्य केले. पोलीस कॉन्स्टेबल व्यंकट येवते यांनी वेळोवेळी साक्षीदारांना समन्स बजावून साक्षीदार हजर राहण्यास मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT