किनवट : मदनापूर शिवारातील रेल्वे पटरीच्या पूर्वेकडील जंगलातील नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर किनवट पोलिसांनी बुधवारी (दि.१२) सकाळी छापा टाकला. या कारवाईत गावठी हातभट्टीची सुमारे १० लिटर दारू आणि ३०० लिटर मोहफुल सडवा रसायन असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी माधव धोंडीबा माहुरे (वय ५९, रा. शनिवारपेठ, किनवट) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनापूर शिवारातील रेल्वे पटरीच्या पूर्व बाजूस जंगलातील नाल्याच्या काठावर माहुरे हा विनापरवाना गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. बुधवारी सकाळी सुमारे ६.५० वाजता पोलिस पथकाने छापा टाकला असता, हातभट्टी पेटवून दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या कारवाईत पाच लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे १० लिटर गावठी हातभट्टी मोहफुलाची दारू, तसेच १०० लिटर क्षमतेच्या तीन प्लास्टिक टाक्यांमध्ये सुमारे ३०० लिटर मोहफुल सडवा रसायन आढळून आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नितेश वामन लेनगुळे यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९९/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), (ब), (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल नारायण मेंडके करीत आहेत.