नांदेड शहरात 'ऑनलाईन' दरमहा १०० कोटींची उलाढाल  File Photo
नांदेड

Online shopping : नांदेड शहरात 'ऑनलाईन' दरमहा १०० कोटींची उलाढाल

व्यापाऱ्यांचे मरण : बेल-फुलापासून किराणा घरपोच विनासायास उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

Nanded city has a monthly online turnover of Rs 100 crores

नांदेड, पुढारी वृत्तसेवा ऑनलाईन खरेदीची साधने वाढत चालली असून या माध्यमातून होणारी उलाढाल कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ लागली आहे. नांदेड सारख्या शहरात दरमहा किमान १०० कोटीची उलाढाल होत असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. अगदी बेल-फुलापासून ते अवजड वस्तुपर्यंतच्या मागण्या ही माध्यमे पुरवू लागली आहेत. यामुळे छोटे व्यापारी येत्या काळात चहापत्ती आणि बिस्किटे विकण्यापुरती उरतील, अशी भीती व्यक्त होते आहे.

भारत आणि अमेरिकेच्या संबंधात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर बाजाराचा आढावा घेतला असता अद्याप सामान्यांना त्याची झळ तर पोहोचलेली नाही. परंतु अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार घातला पाहिजे, हे सुद्धा कोणाच्या मनाला शिवलेले नाही. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल यासह इतरही अनेक अमेरिकन कंपन्या ऑनलाईन बाजारात धुमाकूळ घालत कोट्यवधीचा व्यवसाय करीत आहेत. मागील महिन्यापासून ब्लिंकिटचे पुनरागमन झाले आहे. येत्या काळात ओला-उबर या शहरांतर्गत वाहतूक कंपन्या सुद्धा येतील.

नुकत्याच संपलेल्या श्रावणात ऑफलाईन बाजारात बेल अगोदर ३० रुपये व नंतर ५० रुपयांना पुडा या दराने मिळत होता. पाऊस पडल्यानंतर तो ५० रुपये पुडा या दराने विकला जात होता. या दिवसात ब्लिंकिटचा पर्याय लोकांनी निवडलेला दिसला. या ऑनलाईन बाजारात ३० रुपर्यात निवडलेला प्रत्येकी तीन पानी वेल आणि पूर्ण १०८, त्यासोबत दुर्वा, दोन-चार फुले अगदी ताजीतवानी घरपोच आली. यामुळे महिला मंडळी खुष आहे. यापुढे सणासुदीचे दिवस आहेत. दोन दिवसांनी बाप्पांचे आगमन होत आहे. याचदरम्यान ज्येष्ठा गौरीचा सण आहे.

पुढे दिवाळी. या निमित्त बेल, फुल, आघाडा, केणा व आवश्यक फळे तसेच मिठाईला मोठी मागणी असते. ही सर्व खरेदी ऑनलाईनच होण्याची शक्यता दिसून येते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, इलेक्ट्रीकल, फर्निचर, किराणा सामान, अन्य दैनंदिन वापराच्या वस्तू पूर्वीपासूनच ऑनलाईन मिळतात. खाद्य पदार्थ पुरविणाऱ्या सुद्धा झोमॅटो, स्विगी यासारख्या कंपन्या आहेत. बेल-फुल, पुजेचे साहित्य यासाठीही आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे छोटे व्यापारी अडचणीत आले आहेत. यापूर्वी वेलनेस, मेडप्लस यासारख्या मल्टीस्टोअर कंपन्यांनी औषधी बाजार उद्धवस्त केला. आता छोट्या किराणा, जनरल स्टोअर्स, भाजीपाला विक्रेते, यांचा नंबर दिसतो आहे. दरम्यान, स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन स्थानिक पातळीवर अशी साखळी निर्माण करावी, असाही मतप्रवाह आहे.

पोलीस आणि ट्रॅफिकचा हातभार

नांदेडसारख्या शहरात वाहतुकीची प्रचंड गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रस्ते नीट राहिले नाहीत. त्यामुळे किरकोळ अपघातांचा धोका आहे. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वेळ खूप वाया जातो. बाजारात वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नाही. वरुन रात्री १० पूर्वी बाजारपेठ बंद करण्याचा पोलिसांचा ससेमिरा. या स्थितीत वेळ, इंधन आणि मनस्ताप वाचविण्यासाठी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मार्केटिंगकडे वळताना दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT