निष्ठावंतांवर अन्याय ! ठाकूर यांचा बंडाचा झेंडा ! pudhari photo
नांदेड

BJP internal issue : निष्ठावंतांवर अन्याय ! ठाकूर यांचा बंडाचा झेंडा !

पंतप्रधानांना पत्र पाठवून कळविली ‌‘मन की बात‌’

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार ठरवताना नांदेडसह ठिकठिकाणी जुन्या-निष्ठावंतांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील उपक्रमशील कार्यकर्ते ॲड.दिलीप ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना पत्र पाठवून त्यात आपली ‌‘मन की बात‌’ सांगितली आहे.

स्थानिक पक्षनेत्यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध जनतेच्या दरबारात जाऊन मी न्याय मागणार असून निष्ठावंतांचा प्रतिनिधी या नात्याने भाजपा बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. नांदेड मनपा निवडणुकीसाठी माघार घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी संपणार आहे. त्यापूर्वी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अर्ज भरणाऱ्यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नांदेड मनपा निवडणुकीसाठी ठाकूर यांनी हनुमानगड (वजिराबाद)-गाडीपुरा प्रभागामध्ये रितसर उमेदवारी मागितली होती. नंतर त्यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्जही भरला; पण पक्षाच्या ‌‘एबी‌’ फॉर्मधारक उमेदवारांमध्ये त्यांचे नाव न आल्यामुळे त्यांची गणना अपक्ष उमेदवारांमध्ये झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर व अन्य ठिकाणीही भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांवर स्थानिक नेतृत्वाकडून अन्याय झाला. त्यांचा प्रतिनिधी या नात्याने मी निवडणूक लढवत असल्याचे तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर आपला कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी नमूद केले.

दिलीप ठाकूर यांचे नाव अलीकडच्या काळात त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे शहरभर परिचित झाले आहे. आपल्या विधायक उपक्रमांना त्यांनी पक्षाची जोड दिली. पंतप्रधानांच्या ‌‘मन की बात‌’ कार्यक्रमाचे अनेक भाग त्यांनी शहरवासीयांसमोर मोठ्या पडद्यावर सादर केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाची जबाबदारी तेथे वास्तव्य करूनच सांभाळली; पण त्यांच्या प्रभागात पक्षाने एका वादग्रस्त कार्यकर्त्यास उमेदवारी दिल्यानंतर नेहमीच संयम बाळगणाऱ्या ठाकूर यांनी अर्ज कायम ठेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

आपली लढाई पक्षामध्ये बेबंदशाही निर्माण करणाऱ्या धनशक्तीविरुद्ध आहे. धनशक्ती विरुद्ध सेवावृत्ती या आपल्या लढाईत प्रभागातील जनता आपल्या बाजूने कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपातील ‌‘अमरनीती‌’मुळे ठाकूर यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले जात आहे. असाच अन्याय पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.नंदू कुलकर्णी, चैतन्यबापू देशमुख, मोहनसिंह तौर, सुप्रिया पाटील रातोळीकर आदींवर झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT