

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः संस्थेमधील आपल्या अधिकारपदांची कायद्याच्या चौकटीतील पूर्तता करण्याच्या बाबतीत वर्षानुवर्षे अयशस्वी ठरलेल्या ‘नांएसो’च्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या अमृतमहोत्सवाचा बराच गाजावाजा चालवला आहे; पण याच संस्थेच्या पीपल्स महाविद्यालयाचे एक संस्थापक सदस्य तसेच माजी उपाध्यक्ष दिवंगत प्रा.म.द.पाध्ये यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा वरील कारभाऱ्यांना विसर पडल्याचे समोर आले आहे.
अर्थशास्त्र विषयातील निष्णात प्राध्यापक आणि लोकशाही समाजवादाचे खंदे पुरस्कर्ते तसेच शिस्तप्रिय प्रशासक ही म.द.पाध्ये यांची ओळख होती. मराठवाड्यामध्ये उच्च शिक्षणाचे पर्व सुरू करताना, स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यावेळच्या राजधानी (हैदराबाद) जवळचा जिल्हा म्हणून नांदेडची निवड करत 1950 साली पीपल्स कॉलेजची स्थापना केली. याच महाविद्यालयामधून पाध्ये यांची या विभागातील अध्यापनाची कारकीर्द सुरू झाली.
वरील कॉलेजचे संचालन करण्यासाठी ‘नांदेड एज्युकेशन सोसायटी’ ह्या नोंदणीकृत संस्थेची स्थापना होण्यापूर्वी नियोजित संस्थेच्या घटनेचा मसुदा ‘पीपल्स’चे पहिले प्राचार्य डॉ.सुरेन्द्र बारलिंगे यांनी केला होता. त्यानुसार स्वामीजींच्या नावावर कॉलेज आणि नांएसोचे संस्थापक अशी नोंद झाली असली, तरी त्यांनी नांदेडमध्ये महाविद्यालय काढावे, ही कल्पना सीताराम पप्पू यांच्यासह पाध्ये यांनी त्यांच्यासमोर सर्वप्रथम मांडली होती.
म.द.पाध्ये तेव्हा नागपूर येथे प्राध्यापक होते. त्यांच्या सूचनेनुसार पीपल्स कॉलेज सुरू करण्याचे ठरल्यानंतर प्राचार्य बारलिंगे यांच्याशिवाय जे 7 प्राध्यापक पीपल्सच्या पहिल्या तुकडीत रुजू झाले, त्यांत वाणिज्य शाखेसाठी पाध्ये हे एक होते. 1950 ते 1963 या कालावधीत त्यांनी पीपल्स आणि योगेश्वरी या महाविद्यालयांत अध्यापन केल्यानंतर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी औरंगाबादकडे प्रयाण केले. नंतर ते तेथेच स्थायिक झाले.
‘पीपल्स’ सुरू झाल्यानंतर या कॉलेजच्या मदतीसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून निधी उभारावा लागला होता. त्यांत पाध्ये यांनीही भरीव योगदान दिले. नंतरच्या काळात तेे दीर्घकाळ या संस्थेच्या कार्यकारी मंडळात होते. त्यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.
पाध्ये यांचा जन्म 2 जानेवारी 2026 सालचा. 2018 साली त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे ठाणे येथे निधन झाले. त्यानंतर ‘नांएसो’च्या निवडणूक रचनेतील ‘संस्थापक सदस्य मतदारसंघ’ हा प्रवर्गच संपुष्टात आला. त्यांच्या निधनानंतर संस्थेच्या कारभाऱ्यांची श्रद्धांजली वाहण्याचा सोपस्कार पार पाडला; पण गेल्यावर्षी 2 जानेवारी रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले, तरी त्याची संस्थेकडे नोंद नव्हती.
आता 2026ची 2 जानेवारी उजाडली आहे; पण गेल्या वर्षभरामध्ये ‘नांएसो’च्या बैठकांमध्ये पाध्ये यांचे साधे स्मरणही करण्यात आले नाही. या माहितीला संस्थेच्या एका सदस्याने दुजोरा दिला. अलीकडच्या काळात या संस्थेमध्ये काही कार्यकारी मंडळ सदस्य व पदाधिकाऱ्यांचा मोठा गाजावाजा केला जात आहे. एका सदस्याचा वाढदिवस दोन्ही महाविद्यालयांमध्ये साजरा झाला; पण विद्यमान कारभाऱ्यांना पाध्ये यांच्यासारख्या संस्थापक सदस्याचे विस्मरण व्हावे, ही बाब खेदजनक असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली.