Nanded child abuse case Pudhari
नांदेड

Nanded Crime | दिव्यांग अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी नायगावातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

Biloli Court Verdict | बिलोली न्यायालयाचा निकाल; नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Minor Girl Assault Case

बिलोली : दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बिलोली येथील न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत २० वर्षे सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी हा निकाल दिला.

ही घटना ९ नोव्हेंबर २०२३ रोजी नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे घडली होती. पीडित मुलगी दिव्यांग असून, ती घरात एकटी असताना आरोपी योगेश भीमराव कोंडेवाड (वय ३२) याने घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पीडितेने उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(ल), ४५२ तसेच पोक्सो कायदा आणि अपंग व्यक्ती अधिकार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी केला. त्यांनी तांत्रिक व वैद्यकीय पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने ८ साक्षीदार तपासले. पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल हे या खटल्यात महत्त्वाचे पुरावे ठरले.

सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप कुंडलवाडीकर यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास आणखी ३ वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

या प्रकरणात सरकारी वकिलांना अॅड. जयेश अग्रवाल, अॅड. योगेश पुंड, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT