बाभळी बंधाऱ्यावर शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन  (Pudhari Photo)
नांदेड

Babhli Protest | बाभळी बंधाऱ्यावर शेतकऱ्याचे जलसमाधी आंदोलन, शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्त्यांचा सहभाग

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ बाभळी बंधाऱ्यावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Farmer Jalsamadhi Protest

धर्माबाद: धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्यावर शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने दिवाळीपूर्वी अनुदान न दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धर्माबाद पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २९ ऑक्टोबर रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे बंद करण्यात आले. या वर्षीच्या पावसामुळे बाभळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून सध्या बंधाऱ्यात १७.४० दशलक्ष घनमीटर (०.६१५ टीएमसी) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची पातळी ३३२.६४ मीटर इतकी नोंदवली गेली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमध्ये या बंधाऱ्याच्या निर्मितीवरून पूर्वी वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर, न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी निकाल देत बंधाऱ्याचे दरवाजे १ जुलै रोजी उघडणे आणि २९ ऑक्टोबर रोजी बंद करणे, तसेच उपलब्ध पाणीसाठ्यातील ०.६ टीएमसी पाणी १ मार्च रोजी तेलंगणात सोडणे असा आदेश दिला होता. त्यानुसार यावर्षीही ही प्रक्रिया पार पडली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ बाभळी बंधाऱ्यावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे

  • बाभळी बंधाऱ्याच्या बँक वॉटर क्षेत्रातील जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना द्यावा.

  • पूररेषा कायम करून बँक वॉटर जमिनींचे हक्क निश्चित करावेत.

  • शासनाने जाहीर केलेले रब्बी पेरणीपूर्व हेक्टरी एक लाख रुपये अनुदान तातडीने द्यावे.

  • शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वंकषपणे करावी.

अधिकाऱ्यांकडे संपूर्ण माहिती नसल्याने शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला. शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT