Nanded Accident News
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाला अपघात झाला File Photo
नांदेड

Nanded Accident : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाला अपघात; एक विद्यार्थी ठार, दोन गंभीर

पुढारी वृत्तसेवा

उमरी : विद्यार्थ्यांना शाळेत नेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षासमोर अचानक आलेल्या हरणाच्या कळपाला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षा पलटी झाली. या अपघातात गणेश गोविंद निलेवार (वय १४) हा विद्यार्थी जागीच ठार झाला तर साक्षी सयाजी निलेवार (वय १५) आणि विनायक माधव मोकले (वय १२) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी घडली.

बळेगाव येथील कृष्णामाई विद्यामंदिर हायस्कूल या शाळेत हातनी येथील विद्यार्थ्यांना घेऊन एक रिक्षा घेऊन जात होती. यावेळी हातनी -बळेगाव रस्त्यावरील वळणाजवळ अचानक हरीणाचा कळप आला. या कळपाला पाहताच चालकाने त्यांना वाचविण्यासाठी रिक्षाला ब्रेक लावला. मात्र कळपातील एका हरणाचे शिंग ऑटोच्या मडगार्डमध्ये अडकल्याने रिक्षा पलटी झाली. त्यानंतर रिक्षामधील विद्यार्थी बाहेर फेकले गेले तर त्यातील तिघे जण ऑटोखाली दबल्या गेले. गणेश निलेवार हा विद्यार्थी या अपघातात जागीच ठार झाला तर साक्षी निलेवार आणि विनायक मोकले हे दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विनायक याच्या डोक्याला व डोळ्याला तर साक्षी हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी विद्यार्थ्याना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराठी नांदेड येथे हालविण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्याना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी एम.एम.चंदापुरे यांनी तातडीने उपचार केले. आ.राजेश पवार यांनी या घटनेतील जखमीची विचारपूस केली. घटनेतील मयत गणेश निलेवार यांचे शवविच्छेदन करून त्याच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस निरीक्षक अंकुश माने हे या घटनेची चौकशी करीत आहेत.

SCROLL FOR NEXT