नांदेड : नांदेडसह जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अंतर्गत आडतदार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी बाजार समितींच्या सचिवांना फैलावर घेत शेतकऱ्यांना सहकार कायदे व वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार तातडीने न्याय मिळवून न दिल्यास आणि दैनंदिन कामकाजात सुधारणा न झाल्यास बाजार समित्या बरखास्त कराव्या लागतील, अशी तंबी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत अडतदार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक सुरू आहे. यासंदर्भात हनुमंत राजेगोरे, संदीपकुमार देशमुख, प्रताप देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांच्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने मंगळवार दि. 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांची बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी थेट मुद्याला हात घालत बाजार समित्यांच्या अंतर्गत आडतदार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणे ही गंभीर बाब आहे, असे मत नोंदविले. शेतकरी हिताच्या उद्देशासाठी बाजार समित्या अस्तित्वात आल्या असताना त्याच उद्देशाला हरताळ फासण्याचा हा प्रकार आहे.
या प्रकरणात शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच सहकार कायदे आणि विविध शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांचा माल खरेदी करून आवक व वजन पावत्या देणे बंधनकारक करत योग्य मुदतीत आडतदार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा बाजार समित्याच बरखास्त कराव्या लागतील, अशी परखड भूमिका जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी मांडली. त्यामुळे बाजार समित्यांना दणका बसला आहे.
बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज राजेगोरे, किशनराव कदम आणि संदीपकुमार देशमुख यांनी विविध बाजार समितीतील वेगवेगळ्या अनियमितता यावरही बोट ठेवले. भोकर बाजार समितीच्या विविध जागांवर अतिक्रमण आणि वजन काटा बंद असल्याची बाबही यातून समोर आली असून सचिवांनी यात सुधारणा होतील अशी ग्वाही यावेळी दिली. या व्यतिरिक्त इतर अनियमितता यांच्यावर पुढील आठवड्यातील बैठकीत विस्तृत चर्चा होणार असल्याने बाजार समित्यांमधील वेगवेगळे गैरप्रकार चव्हाट्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाधिकारीही घेणार फैलावर!
फेब्रुवारी 28 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या समक्ष बाजार समित्यांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी दिली. या बैठकीपूर्वी बाजार समित्यांमधील सर्व व्यवहार कायदेशीररित्या सुरळीत केले जातील अशी अपेक्षा यावेळी हिरे यांनी व्यक्त केली.