नांदेड : शहराचा कायापालट करण्यासाठी ‘अमृत 2.0’ योजनेतून कोट्यवधींचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात विजयनगर, तरोडा (बु.) परिसरातील विकासनगर सोसायटीतील चित्र भीषण आहे. येथील सुमारे 25 टक्के भाग अद्यापही ड्रेनेज सुविधेपासून वंचित असून, सांडपाण्याच्या निचऱ्याअभावी नागरिकांना नरकयातना सोसाव्या लागत आहेत. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन काहींच उपाययोजना करत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विकासनगर सोसायटीतील पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण अशा विविध बोळांमधील सुमारे 25 टक्के घरांना ड्रेनेज लाईन जोडण्यात आलेली नाही. यामध्ये सूर्यवंशी, डॉ. दवणे, धुतराज, अंबुलगेकर, तामटे आणि कावळे यांच्या घरासमोरील भागाचा समावेश आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाली किंवा ड्रेनेज नसल्याने हे पाणी रस्त्यावर साचत आहे. परिणामी, परिसरात डुकरांचा वावर वाढला असून डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. हा परिसर भविष्यात रोगराईचा केंद्रबिंदू ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
मुख्य ड्रेनेज लाईन टाकताना तांत्रिक निकष पाळले गेले नाहीत. दक्षिण-उत्तर मुख्य लाईन किमान चार मीटर खोल असणे आवश्यक असताना ती कमी खोलीवर टाकण्यात आली. यामुळे लेव्हल जुळत नसल्याने उर्वरित घरांचे पाणी मुख्य पाईपलाईनमध्ये सोडणे तांत्रिकदृष्ट्या कठीण झाले आहे. या गंभीर चुकीमुळेच 25 टक्के नागरिक सुविधेपासून वंचित राहिले आहेत.
एककीडे ड्रेनेजचा प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे रस्त्याचे काम घाईघाईने उरकले जात आहे. सिमेंटचे पहिला टप्प्याचे काम केल्यानंतर त्यावर आवश्यक पाण्याचा मारा करण्यात आला नाही. त्यामुळे सिमेंट आणि गिट्टी उघडी पडली असून, या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शुक्रवार, 16 एप्रिल रोजी रहिवाशांनी आयुक्त, गटनेते प्रशांत इंगोले आणि नगरसेवक प्रतिनिधी जोंधळे यांची भेट घेतली. महापौरांच्या सूचनेनुसार महापालिकेचे स्वामी आणि कंत्राटदाराच्या अभियंत्यांनी पाहणी केली खरी, मात्र त्यातून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. 2016 पासून नागरिक पाठपुरावा करत आहेत, पण पदरी फक्त आश्वासनेच पडत आहेत.
“रस्त्याचे काम तातडीने थांबवून आधी मुख्य ड्रेनेज लाईन खोलवर टाकावी, पर्यायी मार्ग शोधून ड्रेनेजचा प्रश्न कायमचा सोडवावा आणि पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन मंजूर करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,“ असा इशारा सोसायटीच्या वतीने देण्यात आला आहे.
ड्रेनेजसारखीच पाण्याची बोंब
विकासनगरच्या ओपन स्पेसमध्येच महानगरपालिकेची मोठी पाण्याची टाकी दिमाखात उभी आहे. मात्र, दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे याच टाकीच्या परिसरातील 25 टक्के घरांना अद्याप पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन मिळालेली नाही. खुद्द महापौरांनी महिनाभरापूर्वी कामाचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन हवेतच विरल्याने प्रशासनाच्या उदासीनतेचे वाभाडे निघाले आहेत.