नांदेड ः धार्मिक कट्टरवाद हा चिंतेचा विषय बनत असताना याचा उन्माद आता शासकीय कार्यालयातही कसा वाढतो आहे, याची कटू अनुभूती नांदेड आकाशवाणीच्या हजारो श्रोत्यांना मंगळवारी पहाटे मिळाली.भक्तिसंगीताचा कार्यक्रम सुरु असतानाच निवेदक चक्क प्रसारण कक्षातच धार्मिक प्रार्थनेला बसला.प्रार्थनेत हे महाशय इतके मग्न झाले, की हे थेट प्रसारण बंद पडल्याचे भानही त्यांना राहिले नाही. या कार्यक्रमाचा आनंद घेणारे हजारो श्रोतेही काही काळ अचंबित झाले होते. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे.
नांदेड आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रमांची सुरुवात दररोज पहाटे 5.53 वाजता ‘वंदे मातरम्’ने होते. मंगळवारच्या कार्यक्रमांची जबाबदारी आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी राहूल आत्राम यांनी केंद्राचे नैमित्तीक उद्घोषक शेख अहेमद यांच्याकडे दिली होती. ‘वंदे मातरम्’नंतर 6.10 ते 6.34 या वेळेतला भक्तिसंगीताचा कार्यक्रम सुरू झाला.
काही वेळातच म्हणजे 6.29 वाजता उद्घोषक शेख अहेमद यांच्या अंगात धार्मिक प्रार्थनेची खुमखुमी शिरली. कार्यक्रम तसाच सुरु ठेवत हा प्रसारण कक्षातच कन्सोलकडे (प्रसारण यंत्र) पाठ फिरवून प्रार्थनेला बसला. 6.35 मिनिटापर्यंत त्याचा प्रार्थनेचा कार्यक्रम सुरुच होता. तोपर्यंत तब्बल 5 मिनिटे या थेट कार्यक्रमाच्या प्रसारणाची पाटी कोरी होती.
या सर्व प्रकाराला कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम हेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही असे प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या आकाशवाणी केंद्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रसारण कक्षात अशा प्राकरे धार्मिक कट्टरतेचा उच्छाद मांडला जात असल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. अशा संतापजनक प्रकाराला पाठिशी घालणे म्हणजे शासकीय नियमांची खुलेआम चिरफाड आणि धर्मवादाला उत्तेजन देणारी बाब म्हणावी लागेल.
ज्या आकाशवाणी प्रसारण कक्षातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासीयांना ‘मन की बात’च्या माध्यमातून संवाद साधतात, त्याच केंद्रात धार्मिक तेढ निर्माण करणारी विकृती डोके वर काढत असेल, तर हे आकाशवाणी केंद्राच्या हजारो श्रोतेगणांचे दूर्दैवच म्हणावे लागेल.
आकाशवाणीतील दैनंदिन कार्यक्रमांचे नियोजन, रुपरेषा, कामाचे वाटप, त्यावर देखरेख अथवा नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राहुल आत्राम यांच्याकडे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनमानसात पोहोचविण्याचे त्यांचे कर्तव्य आहे.परंतु आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी अद्याप असे कुठलेच कार्यक्रम घेतले नसल्याचे कळते.
यापूर्वी नांदेड आकाशवाणी केंद्रात भीमराव शेळके, विश्वास वाघमारे या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शिस्तीचे पालन करीत आकाशवाणी केंद्राची मर्यादा राखण्याचे काम रोखठोक बजावले. परंतु तब्बल 16 वर्षांपासून याच केंद्रात ठाण मांडून बसलेले राहुल आत्राम यांच्या कार्यकाळातील बेशिस्त, बेजबाबदारी आणि बेपर्वाहीने कळस गाठल्याचे सांगितले जाते.‘वंदे मातरम्’चा उच्चार न करणाऱ्या निवेदकाला आत्राम यांचा नेहमीच वरदहस्त असतो, अशीही माहिती मिळाली.
या प्रकरणी आकाशवाणी केंद्राचे सहनिदेशक विश्वास वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकाराची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीअंती सर्व काही स्पष्ट होईल, असेही ते म्हणले. कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.