

जळकोट : ग्रामीण भागातील लोकशाही प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्थांसाठी लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी होऊ घातलेल्या जि. प./ पं. स. निवडणुकीसाठी जळकोट तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांचे उमेदवार गावभेटी करीत मतदारांशी संवाद साधत आहेत. मतदानाचे दान आपल्याच पदरात टाकण्याची विनवणीही मतदारांना करीत आहेत.
एकंदर तालुक्यात निवडणुकीची रंगत वाढली आहे. काँग्रेस (आय ), भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) या प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरल्याने लढती रंगतदार होत आहेत.
तालुक्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी उमेदवार निवड प्रक्रियेला गती देऊन इच्छुकांमधून उमेदवारांची निवड केली आहे. उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग केल्यानंतर त्यात काहीजण यशस्वी ठरले तर काही जणांची निराशा झाली आहे. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी दुसऱ्याच पक्षाची उमेदवारी घेतली आहे. काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी दिसून येत असून बंडखोरीचे सूर उमटत आहेत. त्यामुळे काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा, निधी वाटप, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य व शिक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. सत्ताधारी पक्ष आपली कामगिरी मांडत आहे तर विरोधकांकडून अपूर्ण विकासकामांवर टीका केली जात आहे. सभांमधून आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढताना दिसत आहे. गावोगावी बैठका, प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय करण्यात आले आहे.
सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला जात आहे. राजकीय हालचालींमुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. स्थानिक विकास, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते इत्यादी बाबतींत निर्णय घेणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांसाठी ही निवडणूक होत असून त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
शासनाच्या योजना आणि धोरणे गावापर्यंत पोहोचविण्याचे काम हे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर करणार आहेत. त्यामुळे जबाबदार, प्रामाणिक, प्रश्नांची जाण असणारा, प्रश्न सोडविण्याची क्षमता असलेला उमेदवार निवडून देण्याकडे तालुक्यातील मतदारांचा कल दिसून येत आहे. ऐनवेळी इतर पक्षाकडून उमेदवारी घेतलेले उमेदवार व बंडखोरी करुन अपक्ष म्हणून उभे असलेले उमेदवार यांच्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. आगामी निवडणूक निकाल तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणारे ठरतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.